CJI Suryakant on Delhi district court case: देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश सुर्य कांत यांनी दिल्लीतील न्यायालयातील घटनेवरून कडक इशारा दिला आहे. “इथे गुंडगिरी मान्य केले जाणार नाही”, असे ते म्हणाले आहेत. नेमकं कोणत्या प्रकरणात आणि कुणाला त्यांनी इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात.

७ फेब्रुवारी रोजी सरन्यायाधीश सुर्य कांत यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील जिल्हा न्यायालयात मारहाणीचा आरोप करणाऱ्या वकिलाला दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. न्यायालयात मारहाण झाल्याचा आरोप या वकिलाने केला आहे.

तीस हजारी न्यायालयाच्या वकिलावर हल्ला प्रकरण

एका वकिलाने मुख्य न्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणीसाठी आपली याचिका मांडली. वकिलाने सांगितले की, “मी तीस हजारी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश (ADJ) हरजीत सिंह पाल यांच्या न्यायालयात हजर झालो. मी आरोपीचे प्रतिनिधित्व करत होतो. तक्रारदाराच्या वकिलाने अनेक गुंडांसह माझ्यावर हल्ला केला.”

न्यायालयात सर्वांसमोर मारहाण; वकिलाचा गंभीर आरोप

न्यायाधीश न्यायालयातील आसनावर बसलेले असताना संबंधित व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला, असा गंभीर आरोप एका वकिलाने केला आहे. या घटनेच्या वेळी न्यायालयातील सर्व सदस्य उपस्थित होते, अशी माहितीही वकिलाने दिली. यावर सरन्यायाधीशांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही घटना ७ फेब्रुवारी रोजी घडली असल्याची माहिती आहे. तसेच त्यांनी संबंधित वकिलाला विचारले की, या प्रकरणाची माहिती दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना दिली आहे का? यानंतर सरन्यायाधीशांनी संबंधित वकिलाला या घटनेबाबत दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे औपचारिक तक्रार करण्याचे निर्देश दिले.

अशा प्रकारचे ‘गुंडाराज’ आम्हाला मान्य नाही

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी संबंधित वकिलाला उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. तसेच या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहण्यास सांगून, पत्र पाठवल्यानंतर माहिती देण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची मुख्य न्यायाधीशांनी दखल घ्यावी आणि प्रशासकीय पातळीवर योग्य कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. “अशा प्रकारची गुंडगिरी आम्हाला मान्य नाही. याचा अर्थ कायद्याचे राज्य कोसळत असल्याचे संकेत आहेत,” असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. तसेच संबंधित वकिलाला उच्च न्यायालयात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.