CJI Take A Call On Application To Recall Verdict : मुख्य निवडणूक आयुक्त कायदा प्रकरणातील खंडित निकालाला मागे घेण्याची मागणी करणाऱ्या अर्जाची सरन्यायाधीश सूर्यकांत पडताळणी करणार आहेत. लाईव्ह लॉने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यासाठी ‘मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि पदाचा कालावधी) कायदा, २०२३’ अस्तित्वात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेचे नियमन करण्यासाठी संसदेने संमत केलेला एक महत्त्वपूर्ण कायदा आहे.

दोन न्यायाधीशांची भिन्न मतं

मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा, २०२३ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना २३ सप्टेंबर २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने (न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा) हा खंडित निकाल दिला. मात्र, हा निकाल मागे घेण्याची मागणी करण्याकरता ज्येष्ठ वकील गोपाळ शंकरनारायण यांनी एक अतंरिम अर्ज केला आहे.

त्यांनी खंडपीठाला माहिती दिली की, या खंडित निकालाच्या विरोधात दुसऱ्या एका पक्षाने क्युरेटिव्ह याचिका देखील दाखल केली आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी या प्रकरणावर सुनावणी घेण्यास मान्यता दिली आहे. “आम्ही याची पडताळणी करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ”, असं सरन्यायाधीश म्हणाले. सरन्यायाधीशांनी हे देखील सांगितलं की, क्युरेटिव्ह याचिका दाखल केल्याचं त्यांनी वाचलं आहे. यावर शंकरनारायणन यांनी होकार दिला आणि सांगितलं की ती दुसऱ्या एका पक्षाने दाखल केली आहे. “परंतु क्युरेटिव्ह याचिकेच्या आधी पुनर्विचार याचिका दाखल करणे आवश्यक असतं”, असं नमूद करत ज्येष्ठ वकिलांनी स्पष्ट केलं की त्यांचा अर्ज हा केवळ एक अंतरिम अर्ज आहे.

खंडपीठाचा भाग असलेले न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांचा मुलगा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थायी वकील असल्याने, या प्रकरणात पक्षपातीपणाची रास्त शंका येऊ शकते, या कारणास्तव हा अर्ज दाखल करण्यात आल्याचं समजतं.

२३ सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस. सी. शर्मा यांच्या खंडपीठाने सीईसी कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका मोठ्या खंडपीठाकडे पाठवायच्या की नाही यावर भिन्न मते व्यक्त केली होती. न्यायमूर्ती दत्ता यांनी हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं, तर न्यायमूर्ती शर्मा यांचं मत याउलट होतं. मात्र, शेवटी या खंडपीठाने हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवलं आणि हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर ठेवलं.