राजधानी दिल्लीत यशस्वी आंदोलन केल्यानंतर आता आगामी रणनीती ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची (CJP) कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. “भाजपाच्या निधीचा स्रोत काय आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं,” अशी मागणी करत सौरभ दास यांनी पीएम केअर्स फंड (PM CARES) आणि पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीचे (PMNRF) तातडीने ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना सौरभ दास म्हणाले की, “जनतेचा मोठा पाठिंबा मिळाल्यानंतर हे आंदोलन तळागाळातील लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे, यावर आमची कोअर कमिटी सध्या विचारमंथन करत आहे. आंदोलन यशस्वी झाल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न आम्हाला विचारला जात होता. आम्ही पुढील रणनीती आखत असून येत्या ६ ऑगस्ट रोजी आमचा आगामी रोडमॅप जाहीर करू.”
‘तुम्ही आमची कागदपत्रे मागता, तर तुमची दाखवा!’
केंद्र सरकारवर निशाणा साधताना दास यांनी आरोप केला की, “विरोधक आणि आंदोलकांना वारंवार कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाते, मात्र दुसरीकडे भाजपाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कोणतीही पारदर्शकता नाही. घराच्या भाड्यापासून ते प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचा हिशोब आमच्याकडून मागितला जातो. मग मोदीजींनीही आपली पदवी दाखवावी. पीएम केअर्स आणि PMNRF चे ऑडिट झालेच पाहिजे. भाजपाला नेमका कुठून निधी मिळतोय? आम्ही आमचा हिशोब देऊ, पण तुम्ही आधी तुमची कागदपत्रे देशवासीयांना दाखवा.”
याशिवाय, २० जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान आंदोलकांवर झालेल्या पोलिस लाठीमार आणि अत्याचाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
CJP राजकीय पक्ष बनणार का? संस्थापक अभिजित दिपके यांनी दिली माहिती
दरम्यान, सीजेपी (CJP) चे संस्थापक अभिजित दिपके यांनी मंगळवारी पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वाची माहिती दिली. “बुधवारी होणाऱ्या बैठकीत जंतर-मंतरवरील आंदोलनाचा आढावा घेतला जाईल. तसेच देशभरात संघटन वाढवणे आणि पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणे यावर चर्चा होईल. मात्र, सध्या या संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही,” असे दिपके यांनी स्पष्ट केले.
‘एएनआय’ (ANI) शी बोलताना दिपके म्हणाले की, “जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या अभिप्रायावर बैठकीत चर्चा होईल, जेणेकरून भविष्यातील कार्यक्रम अधिक प्रभावी करता येतील. सध्या सीजेपी राजकीय पक्ष बनवण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा झालेली नाही. ही संघटना सामाजिक चळवळ म्हणूनच काम करत राहील, यावर सर्व सदस्यांचे एकमत आहे.”
