शुक्रवारी दिल्लीतील प्रसिद्ध कॅनॉट प्लेस परिसरात ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चापूर्वी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यानंतर दिपके यांची शनिवारी काही अटींसह जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक नोटीसकडे दुर्लक्ष करत मोर्चावर ठाम राहिल्याने दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली होती. आज त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

शुक्रवारी कॅनॉट प्लेस येथे ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन आयोजित न करण्याबाबत दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, हे आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ते ठाम राहिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतरची दिपकेंची पहिली पोस्ट

“२४ तास वायफाय आणि फोनशिवाय तुरुंगातून बाहेर पडताना कसे वाटते”, असे लिहीत दिपकेंनी अभिनेता शाहरुख खान यांच्या फोटोसह X वर पोस्ट केली आहे.

अभिजीत दिपकेंना सशर्त जामीन मंजूर

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, दिपकेंवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६ आणि १७० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शांतताभंग आणि दखलपात्र गुन्ह्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी ही कलमे दाखल केली जातात. दिपके यांना आज मंदिर मार्ग ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले गेले. सुनावणीनंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी त्यांना शांतता कराराच्या बॉण्डवर स्वाक्षरी करावी लागली. ज्यात सुमारे वर्षभर शांतता राखण्याचा समावेश आहे, अशी माहिती समोर येत आहे.