झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात रांचीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे लोण आता  देशभरात पसरू लागले आहे. गेल्या नऊ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणारे विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महातो यांच्या समर्थनासाठी आता महाराष्ट्रातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आक्रमक भूमिका घेत, आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलीस दडपशाहीवरून सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले आहे.

“राजकीय पक्षांवर लाठीमार का होत नाही?”

छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना अभिजित दिपके यांनी पोलिसांच्या दुटप्प्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केले. “जेव्हा विविध राजकीय पक्ष मोर्चे आणि आंदोलने काढतात, तेव्हा पोलीस अश्रूधुर किंवा लाठीहल्ला का करत नाहीत? मग सर्व दडपशाही आणि कारवाई फक्त आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवरच का केली जाते?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.

शांततेच्या मार्गाने उपोषण करणाऱ्या देवेंद्र महातो यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा त्यांनी तीव्र निषेध केला. “देवेंद्र महातो यांच्यावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. विद्यार्थ्यांवर असा अत्याचार करून सरकारला नक्की काय साध्य करायचे आहे? देशातील सर्वच सरकारांनी या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,” असे दिपके म्हणाले.

अभिजित दिपके झारखंडला जाणार का? रिपोर्टरच्या प्रश्नावर दिलं स्पष्ट उत्तर

झारखंडमध्ये स्वतः प्रत्यक्ष न जाण्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिपके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “माझी टीम आधीपासूनच झारखंडमध्ये पोहोचली असून ती आंदोलक विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष मैदानावर काम करत आहे. या संपूर्ण लढ्याचे मुख्य नेतृत्व देवेंद्र महातो यांच्याकडेच राहावे आणि सर्वांचे लक्ष त्यांच्यावरच केंद्रित राहावे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. मला स्वतःचा चेहरा चमकवून प्रसिद्धी मिळवण्यात अजिबात रस नाही.”

झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या या लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत, आपली टीम विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आणि न्यायासाठी शेवटपर्यंत पाठीशी उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘तुमच्या जिद्दीला सलाम!’; फोनवरून साधला संवाद

अभिजीत दिपके यांनी देवेंद्र महातो यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांच्या संघर्षाचे कौतुक केले.

“देवेंद्रभाई, तुमच्या धैर्याला आणि जिद्दीला आमचा सलाम! तुम्ही झारखंडच्या तरुण पिढीचा बुलंद आवाज आणि प्रेरणा आहात. या लढ्यात आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे आहोत. आज देशातील तरुणांना तुमच्यासारख्या लढवय्या नेतृत्वाची खरी गरज आहे.” –  अभिजीत दिपके (संस्थापक, कॉक्रोच जनता पार्टी)