Abhijeet Dipke Mamata Banerjee Meeting on INDIA Alliance Rally: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात १ नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा आयोजित केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील या सभेच्या पूर्वसंध्येला, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दिपके यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी दिपके यांच्यासह इतर विद्यार्थी आणि युवा नेत्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले.

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

“मला या सर्व तरुणांचा प्रचंड अभिमान आहे. केवळ मलाच नाही, तर आजच्या संपूर्ण युवा पिढीला त्यांचा अभिमान वाटतो. या आंदोलनाचे ते प्रणेते आणि संस्थापक आहेत,” असे गौरवोद्गार ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना काढले.

रविवारी (१ नोव्हेंबर) होणाऱ्या सभेला सीजेपीने दिलेल्या पाठिंब्याचे स्वागत करत तृणमूल काँग्रेसही या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे अभिजित दिपके यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ममता बॅनर्जी यांचे आभार मानले. “नीट पेपरफुटीविरोधात जंतरमंतर येथे झालेल्या आमच्या पहिल्या आंदोलनाला ममता बॅनर्जींनी ज्या प्रकारे खंबीर पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी मी आलो होतो. त्या सातत्याने युवा आंदोलनाच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक केली, तेव्हाही त्यांनी आम्हाला भक्कम साथ दिली होती,” अशी माहिती दिपके यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

‘इंडिया आघाडीला पाठिंबा, पण स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार’

रामलीला मैदानावरील मोर्चात सहभागी होण्याबाबत विचारले असता दिपके यांनी स्पष्ट केले की, ते या मुद्द्याला पाठिंबा देत असले तरी संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवतील. “उद्याच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे; मात्र कॉक्रोच जनता पार्टी ही एक स्वतंत्र संघटना आणि तटस्थ व्यासपीठ आहे. आम्हाला ते तसेच कायम ठेवायचे आहे. मतांच्या कथित चोरीविरोधात लढणाऱ्या प्रत्येक संघटनेला आमचा पाठिंबा असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाचे निमंत्रण

विविध अडचणींचा सामना करत आंदोलन पुढे नेणाऱ्या या युवा कार्यकर्त्यांचे ममता बॅनर्जी यांनी तोंडभरून कौतुक केले. याबरोबरच त्यांनी दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पश्चिम बंगालमध्ये येऊन विविध उपक्रम राबवण्याचे निमंत्रणही दिले. कोलकात्यामध्ये कार्यक्रम घेण्याबाबत विचारले असता, त्याविषयीचा निर्णय या तरुणांचाच असेल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.