कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या आगामी राजकीय आणि सामाजिक प्रवासाची दिशा अखेर स्पष्ट केली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याऐवजी, देशातील व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक भक्कम ‘दबाव गट’ म्हणून सक्रिय राहण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘सीजेपी’ने घेतला आहे. संघटनेचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.
आता दिपके यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुण पिढीला विशेष संबोधित करावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकार कोणती ठोस पावले उचलत आहे, याची स्पष्ट माहिती द्यावी, ही नवी मागणी केली आहे. मध्यरात्री उशीरा X या समाजमाध्यमावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी ही मागणी केली आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून होणाऱ्या पंतप्रधानांच्या पारंपरिक भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. या पार्श्वभूमीवर, देशातील मोठ्या युवा लोकसंख्येचे प्रश्न, रोजगार आणि त्यांच्या विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांवर पंतप्रधानांनी थेट संवाद साधणे अत्यंत गरजेचे असल्याचे दीपके यांनी नमूद केले.
‘तरुणांच्या भविष्यासाठी सरकारचे पाऊल काय?’
अभिजित दिपके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही पंतप्रधानांना विनंती करतो की, त्यांनी या स्वातंत्र्यदिनी देशातील तरुणांशी संवाद साधावा आणि त्यांच्यासाठी सरकारकडून नक्की काय उपाययोजना केल्या जात आहेत, हे स्पष्टपणे सांगावे.”
सध्या देशातील युवा वर्ग शिक्षण, रोजगार आणि भविष्यातील संधींबाबत अत्यंत उत्सुक आहे. केंद्र सरकारकडून तरुणांच्या सक्षमीकरणासाठी आखल्या जाणाऱ्या धोरणांची आणि निर्णयांची अधिकृत माहिती थेट पंतप्रधानांच्या मुखातून ऐकायला मिळावी, अशी भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात युवा घटकावर विशेष भर दिला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेची घोषणा
पत्रकार परिषदेत बोलताना अभिजित दीपके यांनी संघटनेच्या आगामी ‘क्या बोलती पब्लिक’ या विशेष देशव्यापी मोहिमेची माहिती दिली. येत्या सप्टेंबर महिन्यापासून ही व्यापक मोहीम महाराष्ट्रभर आणि देशभरात राबवली जाणार आहे. विद्यार्थी, तरुण आणि सामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या मोहिमेच्या केंद्रस्थानी देशातील बिघडलेली शिक्षण व्यवस्था आणि अवाक्याबाहेर गेलेले शिक्षण शुल्क हा मुख्य मुद्दा असणार आहे. सर्वसामान्यांच्या मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून काम करण्याचा निर्धार दीपके यांनी यावेळी व्यक्त केला.
