CJP Parliament March update : शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात सोमवारी हजारो तरुण-तरुणी पोलीस आणि निमलष्करी दलाचे बहुस्तरीय सुरक्षाकवच मोडून संसदेवर धडकले. महिनाभर जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलन आणि उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने सोमवारी तरुणांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला. हाच रोष आजही संसदेवर कायम राहणार आहे. कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आजच्या मोर्चाविषयी माहिती दिली. आजही संसदेवर मोर्चा नेणार असल्याचं अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

वीज खंडित, फोन जॅमर, तरीही जंतर-मंतरवर आंदोलक आक्रमक

दिवसभर संसदेवर मोर्चा काढून झाल्यानंतर आंदोलक पुन्हा जंतर-मंतर येथे परतले. तिथे पोलिसांनी आंदोलकांचं व्यासपीठ हटवलं होतं. त्यामुळे आंदोलकांनी मध्यरात्रीच पुन्हा तात्पुरतं व्यासपीठ तयार केलं. मध्यरात्री जंतर-मंतर येथे वीज खंडित करण्यात आली होती. फोन जॅमर बसवण्यात आले होते. मात्र, अशा अंधाऱ्या रात्रीतही आंदोलकांनी मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने सरकारविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली. दरम्यान, काही आंदोलकांनी आंदोनलस्थळी पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं.

दरम्यान, “आम्ही पुन्हा एकदा मोर्चा काढू. आम्ही जंतर-मंतरचं हे आंदोलन स्थळ सोडणार नाही”, अशी भूमिका अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केली. त्यामुळे दिल्लीत आजही तरुणाई रस्त्यावर उतरून सरकाविरोधातील रोष व्यक्त करणार आहे.

इंडियन एक्स्प्रेसने मध्यरात्री जंतर-मंतरवर उपस्थित असलेल्या आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून बसने प्रवास करून आलेल्या आयुष कश्यप (२१) म्हणाला, “शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या माझ्या आई-वडिलांना मी सांगितलं आहे की, मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मी परत येईन. मी गरजेच्या सर्व वस्तू आणल्या आहेत; उशी, चादर, टूथब्रश… हे सर्व आणलं आहे. मी शेवटपर्यंत इथे थांबायला तयार आहे”, असं बी.कॉमचा विद्यार्थी कश्यपने सांगितलं.

दिल्लीच्या महाराणी बागमध्ये राहणारी आयुषी गुप्ता (२३) पाण्याच्या बाटल्या आणि गुड डे बिस्किटे घेऊन आली होती. किरोरी माल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारी आयुषी म्हणाली, “माझे आई-वडील माझ्यासोबत आले होते, पण ते वेगळे झाले आहेत. हे सर्व सामान वाटल्यानंतर मी त्यांना भेटणार आहे.”

दिल्लीत पोलीस बंदोबस्त कायम

तसंच, “संसदेवरील पोलीस बंदोबस्त तसाच राहील. आम्ही पुन्हा बॅरिकेड्स उभे करू”, अशी प्रतिक्रिया उपनिरिक्षिक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने दिली. दिल्ली पोलिसांनी अनेक गुन्हे नोंदवण्यास सुरुवात केली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल फोनवरील व्हिडिओंची तपासणी केली जात आहे. तसंच हे आंदोलन एखाद्या मोठ्या कटाचा भाग होता का, याचाही तपास केला जात आहे.

रात्री पाऊस पडला, आंदोलकांनी घेतला व्यासपीठाखाली आश्रय

दिवसभर आंदोलन करून झाल्यानंतर आंदोलक पुन्हा जंतर मंतरवर पोहोचले. मात्र, पाऊस सुरू झाला. अशावेळी विद्यार्थ्यांनी व्यासपीठाखाली आश्रय घेतला.