अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारे आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक म्हणून सोशल मीडियावर चर्चेत आलेले अभिजीत दिपके पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. सोशल मीडियावर एका गटाकडून त्यांच्या परदेशी शिक्षणावर, पदवीवर आणि स्कॉलरशिपवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, दिपके यांनी एक्स (ट्विटर) वरील आपल्या पोस्ट्सच्या मालिकेतून विरोधक व ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे.
“BU अभिमानाने सांगते, मग दिल्ली विद्यापीठ मोदींबद्दल शांत का?”
आपल्या पोस्टमध्ये बोस्टन युनिव्हर्सिटीचा (BU) संदर्भ देत अभिजीत दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीच्या वादावर भाष्य केलं आहे. “बोस्टन युनिव्हर्सिटीने त्यांचा माजी विद्यार्थी म्हणून माझ्यावर विशेष लेख प्रसिद्ध केला. मग दिल्ली विद्यापीठ (DU) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले माजी विद्यार्थी म्हणून अभिमानाने का सादर करत नाही? ते तर देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या पदवीची माहिती लपवण्यापेक्षा दिल्ली विद्यापीठाने त्याचा गौरव करायला हवा की नाही?” असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला आहे.
“८० वर्षांचे प्रोफेसरही ‘त्या’ आयटी सेलपेक्षा कूल होते!”
आपल्या पदवीवर शंका घेणाऱ्यांवर उपरोधिक टीका करताना दिपके यांनी बोस्टन युनिव्हर्सिटीतील आपल्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. “काही जण असा दावा करत आहेत की मी कधी बोस्टन युनिव्हर्सिटीत गेलोच नाही आणि मी फ्रॉड आहे,” असे नमूद करत दिपके यांनी पुढे लिहिले, “माझ्या ८० वर्षांच्या प्रोफेसरचा अंदाजही ‘पॉपॉंच्या आयटी सेल’पेक्षा अधिक ‘कूल’ होता! तिथे आम्ही किती मजा केली हे या ट्रोलर्सना कसे समजावून सांगू? आमच्या बॅचच्या शेवटच्या दिवशी मी ‘बॅकस्ट्रीट बॉईज’चे गाणेही प्ले केले होते.”
हॅकिंगचा प्रयत्न आणि कटकारस्थानांचे दावे
आपल्या विरोधात सुरू असलेल्या सोशल मीडिया ट्रान्सपरन्सीवर थेट भाष्य करताना दिपके म्हणाले, “ऑनलाइन ट्रोल करणाऱ्यांची अवस्था अत्यंत हास्यास्पद झाली आहे. अर्धी लोकसंख्या मी बोस्टन युनिव्हर्सिटीत शिकलोच नाही असा दावा करत आहे, तर उरलेली अर्धी लोकसंख्या माझे ऑफिशियल ‘BU’ अकाउंट हॅक करण्यात व्यस्त आहे. आधी सर्वांनी एकत्र येऊन ठरवा की नक्की कोणता बनाव रचायचा आहे! इतरांच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष द्या.”
व्हिडिओमध्ये अभिजीत दिपके नेमकं काय म्हणाले?
“गेले काही दिवस एका विशिष्ट गटाकडून माझ्याविरुद्ध असे लिहिले जात आहे की, मी कधी बोस्टनला गेलोच नाही… मी तिकडे शिक्षण घेतलेच नाही… माझी तिकडे पदवीच झाली नाही. पण त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की, माझ्याजवळ तिथली डिग्री आहे, स्कॉलरशिपचे पत्रही आहे. मी माझी डिग्री दाखवायलाही तयार आहे; पण तुमच्या Pawpaw यांचे काय होणार? तुम्ही ज्याप्रमाणे माझी डिग्री मागत आहात, त्याप्रमाणेच जर का या देशातील लोकांनी तुमच्या Pawpaw ची डिग्री मागायला सुरुवात केली तर काय होईल? अशा परिस्थितीत Pawpaw कुठे जाणार?
चला, मी उद्या माझी डिग्री दाखवतो… तुम्ही Pawpaw ना पण सांगा की त्यांनीही उद्या त्यांची डिग्री दाखवावी. मी सगळ्या कागदपत्रांसह तयारच आहे; तुम्ही आहात का?”
‘Pawpaw’ (पॉपॉ) हा जेन झी (Gen Z) पिढीमध्ये वापरला जाणारा एक शब्द आहे. याचे दोन मुख्य अर्थ होतात:
पाश्चात्य देशांमध्ये (विशेषतः अमेरिकेत) अनेक तरुण प्रेमाने किंवा आपुलकीने आपल्या आजोबांना ‘Pawpaw’ असे म्हणतात. सोशल मीडियावर Gen Z मधील तरुण जे कुत्रे किंवा मांजर पाळतात, ते स्वतःला ‘Dog Pawpaw’ किंवा प्राण्याचे ‘Pawpaw’ म्हणजेच त्यांचे पालक/पप्पा म्हणून संबोधतात.
(टीप: काही ठिकाणी ‘Pawpaw’ हे एका उत्तर अमेरिकन फळाचे नाव देखील आहे, पण Gen Z स्लँग किंवा संभाषणात याचा वापर वरील नातेसंबंधांसाठीच जास्त होतो.)
सोशल मीडियावर जोरदार चर्चा
अमेरिकेतील नामांकित विद्यापीठातून जनसंपर्क (Public Relations) विषयातील पदवी पूर्ण करणाऱ्या अभिजीत दिपके यांच्या या ट्विट्सनंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. एका बाजूला त्यांच्या परदेशातील शिक्षणाच्या खर्चावरून आरटीआय व चौकशीच्या मागण्या केल्या जात असताना, दिपके यांनी आपली स्कॉलरशिप व शैक्षणिक कर्जाची कागदपत्रे दाखवत सर्व आरोप फेटाळले आहेत. तितकेच नव्हे, तर “मी माझी कागदपत्रे दाखवायला तयार आहे, पंतप्रधानांनीही आपली पदवी सार्वजनिक करावी,” असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.
