केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेल्या पक्षप्रवेशाच्या ऑफरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आठवलेंच्या प्रस्तावावर उत्तर देताना अभिजीत दिपके यांनी थेट सवाल करत विचारले की, “एका महिन्यापूर्वी तुमच्यासाठी मी देशद्रोही होतो ना?”
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील एका कार्यक्रमादरम्यान अभिजीत दिपके यांना आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते. “अभिजीत दिपके हे तरुण, आक्रमक आणि आंबेडकरी विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि समाज व पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षात सामील होण्याचा विचार करावा,” असे वक्तव्य आठवले यांनी केले होते.
सोशल मीडियावरून आठवलेंना प्रत्युत्तर
आठवलेंच्या या वक्तव्यानंतर अभिजीत दिपके यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत, “अहो, पण एका महिन्यापूर्वीच तर तुमच्यासाठी मी देशद्रोही होतो ना?” असा टोला त्यांनी लगावला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले रामदास आठवले यांचा ‘आरपीआय’ पक्ष केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी ‘एनडीए’ (NDA) आघाडीचा प्रमुख घटक आहे.
शाळांच्या दुरवस्थेविरोधात अभिजीत दिपके यांचे आंदोलन
सध्या अभिजीत दिपके हे महाराष्ट्रात सक्रिय आहेत. त्यांनी राज्यभरातील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी ‘शाळा ठीक करा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधांचा विकास, शैक्षणिक दर्जा वाढवणे आणि माध्यान्ह भोजनाची गुणवत्ता सुधारणे या मागण्यांसाठी ते प्रयत्न करत आहेत.
यापूर्वी दिल्लीतील जंतर-मंतरवर अभिजीत दिपके यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनामुळे अभिजीत दिपके देशभर चर्चेत आले होते.
निवडणूक लढवण्याबाबत भाष्य
प्रत्यक्ष राजकारणात किंवा निवडणुकांमध्ये उतरण्याची आपली कोणतीही इच्छा नसल्याचे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले आहे. “लोकांचा सध्याच्या राजकारणावर आणि निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, “काही लोकांची अशी अजिबात इच्छा नाही की सरकारी शाळा सुधाराव्यात. कारण गरिबांची मुले शिकली आणि मोठी झाली, तर सध्याच्या राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला निवडणुका जिंकणे कठीण होईल,” असा आरोपही त्यांनी केला.
