कॉक्रोच जनता पार्टीने ३७ दिवस आंदोलन केलं. २५ जुलैला हे आंदोलन संपलं, कारण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जी प्रमुख मागणी होती ती केंद्र सरकारने मान्य केली. २० जुलैला आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी मिळून हे आंदोलन केलं. आता अभिजीत दिपकेंनी अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे. आम्हाला थकवून टाकायचं होतं, सरकारला हे वाटत होतं की आम्ही मैदान सोडून गेलं पाहिजे म्हणजे आमच्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आंदोलन चालू दिलं असं अभिजीत दिपके म्हणाले. तसंच आपला देश संविधानावर चालला पाहिजे असंही दिपके यांनी म्हटलं आहे.

अभिजीत दिपके यांनी काय म्हटलं आहे?

२० जुलैला जे काही झालं त्यात इतकी गर्दी होईल असं वाटलं नाही. पहिल्यांदा सरकारने आमच्याशी २० जुलैला चर्चा केली होती. कारण त्यांना हे कळलं होतं की अभिजीत दिपके, सोनम वांगचुक यांच्यापुरतं आंदोलन मर्यादित राहिलं नाही. मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेलं. आंदोलन संपवा असं काही जण आम्हाला सांगत होते. त्यांना केंद्राकडून पाठवलं गेलं होतं. राजीनामा होणार नाही तू आंदोलन सोडून दे असं सांगितलं गेलं. पण आम्ही टिकून राहिलो. १२ वर्षांच्या मुलींना गळे पकडून मारलं, कपडे फाडून मारलं असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत दिपकेंनी हे म्हटलं आहे.

अमित शाह यांच्याबाबत काय म्हणाले दिपके?

मी आम आदमी पार्टीत काम केलंय, मला जे काही कळतं त्यानुसार दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृहमंत्री यांच्याच अखत्यारीत येतात. अमित शाह यांना कल्पना नव्हती तर मग त्यांना कसली कल्पना? खरंतर अमित शाह यांनी स्वतःहूनच राजीनामा द्यायला हवा होता. कारण त्यांच्यामुळे मुलांचं रक्त वाहिलं आहे. पॅलेट गन्सचा वापर केला आहे विद्यार्थ्यांवर. देशाच्या विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांसारखं ट्रिट केलं. आता आमची ही मागणी आहे की अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण अमित शाह यांनी जे क्रौर्य दाखवलं आहे ते भयंकर आहे. शिवाय दुर्दैवीही आहे. लाठीचार्ज नुसता नव्हता, त्यांना शॉक देण्यात आले. लाठ्यांना खिळे लावण्यात आले. त्यांना त्रास देण्यात आलं. पॅलेट गन वापरली गेली. तुम्ही मुलांना दहशतवाद्यांसारखं वागवलं त्यामुळे अमित शाह यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी अभिजीत दिपके यांनी केली.

दिल्ली पोलीस मारायचे आदेशच घेऊन आले होते-दिपकेंचा आरोप

दिल्ली पोलीस २० जुलैला मुलांना मारण्यासाठीच आले होते. कुणाचा जीव गेला तरी चालेल पण मारा असेच आदेश घेऊन आणि त्याच मानसिकतेत पोलीस आले होते. बेदम मारहाणीचे आदेश दिले गेले होते. त्यामुळे आम्ही २० जुलैला आम्ही मार्च थांबवला. आम्हाला मुलांचं आयुष्य जास्त प्रिय आहे त्यामुळे आम्ही मार्च थांबवला असंही अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे. शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चा काढला होता, यात देशाची बदनामी कशी काय झाली? असाही प्रश्न अभिजीत दिपके यांनी विचारला.