सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके त्यांच्या घरात आलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकावर (PSI) संताप व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर आपल्या घरी भेटायला येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी अभिजीत दिपके यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला थेट घराबाहेर जायला सांगितले.

नेमकं काय घडलं?

अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी काही नागरिक त्यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र, त्यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाराने आलेल्या नागरिकांशी उद्धट वागणूक केल्याचा आरोप दिपके यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या अभिजीत दिपके यांनी तात्काळ त्या पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारला.

दिपके त्या अधिकाऱ्यावर भडकताना म्हणाले, “मी माझ्या घरात लोकांशी बोलत आहे, याचा तुम्हाला काय त्रास आहे? मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय. तुम्ही कोणत्या विभागाचे आहात? तुमचं पोलीस स्टेशन कोणतं आणि तुम्ही कोणत्या पदावर आहात? यांचं नाव लिहून घ्या!”

“मला कोणाला भेटायचं हे मी ठरवणार…”

पोलीस अधिकाऱ्याच्या या वागणुकीवर नाराजी व्यक्त करत दिपके पुढे म्हणाले, “मी कोणाशी बोलायचं आणि कोणाला भेटायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? लोक मला भेटायला येत आहेत. कृपया तुम्ही बाहेर जा, मला तुम्हाला माझ्या घरात पाहायचं नाही. हे असं अजिबात चालणार नाही. माझ्याकडे येणाऱ्या लोकांशी या पद्धतीने बोललेलं मला चालणार नाही, ही बोलायची पद्धत नाही.”

“मला तुम्हाला माझ्या घरात पाहायचं नाही…”

“मला तुम्हाला माझ्या घरात पाहायचं नाही, तुम्ही बाहेर जा,” असं म्हणत दिपके यांनी पोलीस अधिकाऱ्याला आपल्या घराबाहेर जायला सांगितल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांमध्ये यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.