केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर वांगचुक यांच्या उपोषणापेक्षा ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्या खाण्यापिण्याचीच जास्त चर्चा रंगली आहे. वांगचुक उपोषणाला बसले असताना दिपके मात्र कचोरी आणि नुडल्सवर ताव मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. या संपूर्ण वादावर आता स्वतः अभिजित दिपके यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
…आणि कॅमेरा आंदोलनावरून थेट ताटावर गेला!
नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे. यात सोनम वांगचुक हेदेखील सहभागी झाले असून ते आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांत सोशल मीडियावर काही व्हिडिओ तुफान व्हायरल झाले. यामध्ये अभिजित दिपके हे वांगचुक यांच्या शेजारीच बसून कधी ब्रेड पकोडा, तर कधी नुडल्स आणि कचोरी खाताना दिसत आहेत. “एकीकडे वांगचुक देशातील विद्यार्थ्यांसाठी उपाशी पोटी लढत आहेत, मग आंदोलनाचे मुख्य आयोजक असणारे दिपके शेजारी बसून पार्ट्या का करत आहेत?” असा सवाल करत विरोधक आणि नेटीझन्सनी त्यांच्यावर मिम्सचा पाऊस पाडला.
‘तो’ व्हिडिओ जुना, लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न: अभिजित दिपके
या वाढत्या टीकेनंतर अभिजित दिपके यांनी ‘इंडिया टुडे’च्या ‘दिल्ली तक’ या डिजिटल प्लॅटफॉर्मशी बोलताना आपली बाजू मांडली. ते म्हणाले, “हा केवळ मूळ मुद्द्यावरून जनतेचं लक्ष भरकटवण्याचा एक प्रयत्न आहे. जो व्हिडिओ व्हायरल केला जात आहे, तो सोनम वांगचुक सरांचं उपोषण सुरू होण्यापूर्वीचा आहे. वांगचुक सर युरोपमधील एका पर्यावरण परिषदेत गेले असल्यामुळे ते आंदोलनात ८ ते १० दिवसांनी उशिरा सहभागी झाले. तोपर्यंत आम्ही तिथे फक्त आंदोलन करत होतो, उपोषण नाही. तो जुना व्हिडिओ आता चुकीच्या संदर्भाने व्हायरल केला जात आहे.”
आम्ही सगळेच उपाशी राहिलो, तर पोलीस आणि गर्दी कोण सांभाळणार?
“फक्त सोनम वांगचुकच उपोषणाला का बसले आहेत?” या प्रश्नावर उत्तर देताना दिपके म्हणाले की, हा निर्णय स्वतः वांगचुक सरांचाच होता. “वांगचुक सरांना दीर्घकाळ उपोषण करण्याचा पूर्वेतिहास आणि अनुभव आहे. त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की, कोर कमिटीतील (मुख्य संघटक) सदस्यांनी उपोषणाला बसू नये. जर आम्ही सगळेच उपाशी बसलो, तर इथे येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची व्यवस्था कोण करणार? छोट्या-छोट्या गोष्टींवरून पोलिसांशी संवाद कोण साधणार? आंदोलनाचं व्यवस्थापन करण्यासाठी आमचं ठणठणीत असणं गरजेचं आहे,” असं स्पष्टीकरण दिपके यांनी दिलं. तसेच आपल्याला ‘मायग्रेन’चा (अर्धशिशी) त्रास असल्याने उपोषण करणं कठीण असल्याचंही त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं.
वांगचुक यांची प्रकृती खालावली; ५ किलो वजन घटलं
दरम्यान, गेल्या १० दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती झपाट्याने खालावत चालली आहे. उपोषणादरम्यान त्यांचं वजन तब्बल ५ किलोने कमी झालं आहे. “मी स्वतः वांगचुक सरांना प्रकृतीचं कारण देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. आपण उपोषणाशिवायही हे आंदोलन सुरू ठेवू शकतो, असं मी त्यांना सांगितलं. पण जोपर्यंत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, यावर वांगचुक सर ठाम आहेत,” अशी माहिती दिपके यांनी दिली.
