Cockroach Janta Party Abhijeet Deepke CJP Agenda: गेल्या आठवड्याभरापासून फक्त भारतच नव्हे, तर जगभरातल्या राजकीय व सामाजिक वर्तुळात उत्सुकतेचा ठरलेला विषय म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी! भारताचे विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी देशातील काही तरुणांबाबत केलेल्या वक्तव्यावर उमटलेल्या प्रतिक्रियेतून या ऑनलाईन संघटनेचा उदय झाला. सोशल मीडियावर Cockroach Janta Pary या नावाने सुरू झालेल्या हँडल्सवर नेटिझन्स अक्षरश: तुटून पडले. एक्स व इन्स्टाग्रामवर या हँडल्सला फक्त ६ दिवसांत १ कोटी नेटिझन्सनं फॉलो केल्याचं दिसत आहे. हा आकडा आणखी वाढत असून जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सोशल हँडल्सलादेखील या कॉक्रोच जनता पार्टीनं मागे टाकलं आहे. पण यांची नेमकी भूमिका आहे तरी काय?
असा झाला Cockroach Janta Party चा जन्म!
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी कायद्याची पदवी घेतलेल्या पण बेरोजगार असणाऱ्या काही तरुणांबाबत परखड शब्दांत भूमिका मांडली. “आधीच सामाजात खूप सारे असे परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करत असतात. तुम्हाला त्यांच्याच रांगेत जाऊन बसायचंय?” असा सवाल त्यांनी समोरच्या उपस्थितांना केला. लाईव्ह लॉ व एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार ते पुढे म्हणाले, “झुरळांसारखे असे काही तरुण आहेत जे बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे काहीही काम नाही आणि प्रोफेशनमध्ये त्यांना काहीही स्थान नाही. त्यांच्यातले काही प्रसारमाध्यमं होतात, काही सोशल मीडिया होतात तर काही आरटीआय कार्यकर्तेही होतात. काहीजण इतर प्रकारचे कार्यकर्ते होतात आणि सगळ्यांवर हल्ले करायला लागतात. त्यानंतर तुम्ही लोक मानहानीचे खटले दाखल करता”, असं सरन्यायाधीश सुनावणीवेळी म्हणाले.
सरन्यायाधीशांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याच प्रतिक्रियेचा एक भाग म्हणून सोशल मीडियावर अभिजीत दीपके नावाच्या एका तरुणानं Cocroach Janta Party या नावाने हँडल सुरू केलं. या हँडलला अल्पावधीतच भरघोस प्रतिसाद मिळाला. लाखो नेटिझन्सनं हे हँडल फॉलो करायला सुरुवात कली. आता तर भारतीय जनता पक्षालाही फॉलोअर्सच्या बाबतीत हे हँडल मागे टाकत असून त्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचा अजेंडा काय?
या हँडलवरच काही दिवसांपूर्वी कॉकरोच जनता पार्टीचा हेतू अर्थात त्यांच्या या उपक्रमाचा अजेंडा शेअर करण्यात आला आहे. याच अजेंड्याला त्यांचा जाहीरनामादेखील म्हटलं जात आहे. याच नावाने देशात निवडणुका लढवण्याचादेखील मानस त्यांच्याकडून व्यक्त केला जात असून त्यावेळी याच ५ मुद्यांचं प्रतिबिंब त्यांच्या जाहीरनाम्यातदेखील दिसण्याची शक्यता आहे.
१. निवृत्तीनंतर न्यायाधीशांसाठी कोणताही पदलाभ नाही
देशाच्या कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर पदलाभ म्हणून राज्यसभेचं सदस्यत्व दिलं जाऊ नये..
२. प्रत्येक वैध मताचं संरक्षण करावं
कॉक्रोच जनता पार्टी किंवा विरोधी पक्षातील कुणाचंही वैध मत रद्द ठरवलं गेलं, नाव हटवण्यात आलं, तर त्या गुन्ह्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना UAPA च्या कलमांखाली अटक केली जावी. कारण एखाद्या व्यक्तीला मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणं हा एकप्रकारे दहशतवादाचाच प्रकार आहे.
३. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण
संसदेची सदस्यसंख्या न वाढवता महिलांना ३३ टक्के नव्हे, तर ५० टक्के आरक्षण दिलं जावं. त्याचबरोबर महिलांसाठी सर्व मंत्रिमंडळांमध्ये ५० टक्के मंत्रीपदं राखीव ठेवण्यात यावीत.
४. स्वतंत्र माध्यमे, गोदी-मीडिया नव्हे
अदाणी-अंबानींच्या मालकीच्या सर्व माध्यम समूहांचे परवाने रद्द केले जावेत. यातून खऱ्या तटस्थ माध्यमांसाठी मार्ग मोकळा होईल. गोदी मीडियाच्या सर्व वृत्तवाहिन्यांच्या अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी कली जावी.
५. पक्षांतर केल्यास संबंधित नेत्यावर २० वर्षांची बंदी
एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या कोणत्याही आमदार वा खासदाराला कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवण्यावर व सरकारी पदाचा लाभ घेण्यावर २० वर्षांची बंदी घातली जावी.
कोण आहे कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके?
Cockroach Janta Party ची सुरुवात मराठमोळ्या अभिजीत दीपके नावाच्या तरुणानं केली आहे. अभिजीत दीपके सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून त्यांनी आम आदमी पक्षाच्या माध्यम गटातदेखील काम केलं आहे. त्यांनी नुकत्याच काही माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, मतदारांना गृहीत धरण्याची राजकारण्यांची वृत्ती व भारतीय जनता पक्षाचं धोरण यावर परखड शब्दांत टीका केली आहे.
