दिल्लीत सोमवारी देशभरातील तरुणांचा आक्रोश पाहायला मिळाला. सुरक्षा जवानांनी केलेला लाठीमार आणि अश्रुधुराचा माराही संतप्त तरुण वर्गाला थोपवू शकला नाही. त्यामुळे सोमवारी दिवसभर राजधानी दिल्ली तणावाखाली राहिली. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे अनेक आंदोलक जखमी आहे. या जखमी आंदोलकांशी आज अभिजीत दिपके यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सोमवारी झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली. तसंच त्यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
आम्हाला संसद मार्च मागे घ्यावा लागला कारण…
अभिजित दीपके म्हणाले, आम्हाला आमचा संसद मार्च मागे घ्यावा लागला. पोलिसांनी आणखी मुलांचं डोकी फोडू नयेत, म्हणून आम्ही दोन पावलं मागे येण्याचा निर्णय घेतला. सरकारला मुलांच्या जिवाची चिंता नाही हे काल समजले. सोमवारी दिल्ली पोलीस ज्याप्रकारे काठ्या फिरवत होते, मुलांची डोकी फोडत होते, यावरुन एक लक्षात येते की, त्यांना आदेश होता की, कोणाचा जीव गेला तरी चालेल, पण या लोकांना इतकं मारा की, पु्न्हा यांनी सरकारला प्रश्नच विचारले नाही पाहिजेत. पोलिसांना वॉटर कॅनन वापरता आले असते, पण पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे.

पोलिसांनी एका मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला-अभिजित दीपकेंचा आरोप
तरुणींना अमानुषपणे मारले. दिल्ली पोलिसांनी १२ वर्षांच्या मुलीचं डोकं फोडलं, १५-१६ वर्षांच्या मुलींचे गळे पकडले होते. मी एका मुलीला पोलिसांनी मारताना स्वत: बघितलं आहे. या मुलीचे कपडे पोलिसांनी फाडले आणि तिला छातीवर पाय देऊन मारलं. एका मुलीच्या गळ्यावर पोलिसांनी काठीचे फटके मारले आहेत. त्यामुळे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना आंदोलनातील विद्यार्थ्यांचे खून करायचे आदेश देण्यात आले होते का? धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना आणखी मुलांचे खून करायचे आहेत का? असा सवाल कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला. दिल्लीच्या जंतरमंतर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अभिजीत दिपके यांनी हा आरोप केला आहे.
जंतर-मंतर परिसरात दगडाने भरलेले ट्रक कुठून आले?
“१५० पेक्षा जास्त विद्यार्थी रुग्णालयात दाखल आहेत. दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदींच्या आदेशांचं पालन केलं आहे, ही लोकशाही नाही. इथं ट्रकभरून दगड का आले आहेत? आमच्या प्रत्येक आंदोलकांची बॅग तपासल्या जात आहेत. अशा परिस्थितीत जंतर मंतर परिसरात दगडांनी भरलेले ट्रक कुठून आले याचं उत्तर पोलिसांनी द्यावं”, असा सवालही अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला. पोलिसांना नेमप्लेट काढून टाकून मुलांवर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते असाही गंभीर आरोप अभिजीत दिपकेंनी केला.
