देश रस्त्यावरुन चालणार नाही, संसदेत चालणार. जेन झीने एकत्र येऊन आपल्या देशाची बदनामी केली असं विधान योगगुरू रामदेवबाबांनी केलं होतं. याबाबत कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांना प्रश्न विचारला असता त्यांनी रामदेवबाबांनी पतंजली सांभाळावं, उत्पादनांच्या दर्जाकडे लक्ष द्यावं म्हणत त्यांना उत्तर दिलं आहे.
अभिजीत दिपके यांनी रामदेवबाबांना काय उत्तर दिलं?
आम्ही काय देशाची बदनामी केली? लोकशाहीसाठी लढणं ही बदनामी आहे का? आपल्या हक्कांसाठी लढणं ही बदनामी आहे का? लोकशाहीसाठी लढणं याला बदनामी म्हणतात का? महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन आम्ही आंदोलनात चालत होतो. ही जर देशाची बदनामी असेल तर रामदेवबाबांना सांगा आम्ही देश बदनाम करतोय, तुम्ही पतंजलीची उत्पादनं आहेत ज्यामध्ये भेसळ आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय त्याकडे लक्ष द्या. बाकी जेन झी लोकतंत्र, देश सांभाळू शकतो, तुम्ही पतंजलीच्या उत्पादनांच्या दर्जाकडे लक्ष द्या नाहीतर पतंजली बंद होईल असं म्हणत अभिजीत दिपकेंनी रामदेवबाबांना उत्तर दिलं आहे.
रामदेवबाबांचं वक्तव्य काय?
रामदेवबाबा म्हणाले होते, “आपल्या सगळ्यांचे पूर्वज एक आहेत, सगळ्यांचा डीएनए एक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जंतरमंतरवर जेन झीने एकत्र येत भारताला बदनाम केलं. शिवीगाळ करणं ही आपली संस्कृती नाही. आपण कायम सगळ्यांना आदर देऊन पुढे गेलो आहोत. मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे. ज्या काही असहमती असतील त्या संवैधिनिक पद्धतीने चर्चा करुन ठरवल्या पाहिजे. विरोध करायचा असेल तरी तो विवेकपूर्ण विरोध असला पाहिजे.” आता रामदेवबाबांनी जे वक्तव्य केलं आहे
अमित शाह यांचा राजीनामा झाला पाहिजे-दिपके
राहुल गांधी जे म्हणाले ते योग्यच आहे. अमित शाह यांचा राजीनामा झाला पाहिजे ही त्यांची मागणी योग्य आहे. शिवाय कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरुन फंडिंग येतं वगैरे सगळं सांगण्यात आलं. मला सांगा अमित शाह असताना हे शक्य कसं झालं? आम्हाला जर बाहेरुन फंडिंग येतंय तर हे अमित शाह यांचं अपयश आहे. तुम्ही कसले चाणक्य मग? तुम्ही फेल झालेत आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. शिवाय २० जुलैला जे काही पोलिसांनी केलं. ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला, गोळ्या झाडल्या हे सगळं अमित शाह यांच्याशिवाय कुणाच्या ऑर्डरने झालं नसणार असंही अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे.
प्रल्हाद जोशींबाबत काय म्हणाले दिपके?
प्रल्हाद जोशी यांची एक क्लिप पाहिली ते बलात्काऱ्यांचं स्वागत करत होते असं त्यात दिसलं. धर्मेंद्र प्रधान यांना काढून तुम्ही अशा माणसाला आणलंत? पण हे भाजपावाले करणार तरी काय? यांच्या पक्षात सगळे गुंड भरले आहेत. कुलदीप सेनगर गुंडच. राम रहिम बेलवर सारखे बाहेर येतात कारण यांच्या सरकारमध्ये सगळे गुंडच आहेत.
विद्यार्थ्यांना ट्रोल करुन कुणाला काय मिळणार आहे?
विद्यार्थ्यांना ट्रोल करुन कुणाला काय मिळणार आहे? १५ ते २८ वयोगटातली ही मुलं आहेत. त्यांना बदनाम करुन, ट्रोल करुन काय होणार आहे असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे. तसंच देशातल्या पोलिसांना हे आवाहन आहे की त्यांनी संविधानाप्रमाणे वागावं. तुम्ही भाजपाचे पोलीस नाही, तुम्ही संविधानाप्रमाणे वागा असं माझं आवाहन आहे असं दिपके म्हणाले.
