Gyanesh Kumar Election Commission Controversy: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आता निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “ज्ञानेश कुमार हे सर्वात मोठे देशद्रोही आहेत. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा. भारताच्या लोकशाहीला त्यांनी सर्वात मोठा धोका निर्माण केला आहे. ज्ञानेश कुमार निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त झाल्यानंतर ते ठरवत आहेत की, कोणी मतदान करायचे आणि कोणी करायचे नाही. ही लोकशाही आहे का? त्यांनी पूर्ण लोकशाही उलथवून लावली आहे”, असा घणाघाती आरोप करत अभिजीत दिपके यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.

४८ तासांत राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन

पुढच्या ४८ तासांत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास कॉक्रोच जनता पार्टी देशव्यापी आंदोलन सुरू करेल. दिल्लीतून आम्ही या आंदोलनाची सुरूवात करू, अशी घोषणा अभिजीत दिपके यांनी केली.

अभिजीत दिपके यांनी पुढे बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काय केले याची माहिती दिली. “महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये दोन कोटींहून अधिक मतदार हटवले आहेत. पश्चिम बंगालमधील ९० लाख लोकांना मतदान करू दिले नाही. दिल्लीत ४७ लाख मतदार वगळले जात आहे. केरळमध्ये २४ लाख, तमिळनाडूत ९७ लाख, कर्नाटकमध्ये १ कोटी, तेलंगणात ७३ लाख मतदार वगळले जात आहेत. सर्व राज्यांची आकडेवारी एकत्र केल्यास १३ कोटींहून अधिक मतदारांचा हक्का हिरावला जात आहे”, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधक आणि सत्ताधारी एनडीएमध्ये फक्त दोन टक्क्यांचा फरक होता. १३ कोटी मतदार वगळणे म्हणजे जवळपास १३ ते १४ टक्के मतदान कमी करणे. जर २०२४ च्या निवडणुकीत फक्त दोन टक्क्यांमुळे भाजपाचा पराभव होऊ शकला असता, तर ज्ञानेश कुमार मुद्दामहून हे १३ टक्क्यांचे अंतर वाढवत आहेत का? असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला.

२०२४ नंतर अनेक मुख्यमंत्र्यांना हरविण्यात आले

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची एकजुट होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे एक एक करून प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना पराभूत केले गेले. हा योगायोग असू शकत नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात ५० हजार मते हटवली गेली, त्यांचा पराभव झाला, तमिळनाडूमध्ये एमके स्टॅलिन, दिल्लीत अरविंद केजरीवाल, केरळमध्ये पिनराई विजयन सत्तेतून पायउतार झाले. एसआयआरमधून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना कमकुवत केले गेले का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विरोधकांशी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी आमचे देणेघेणे नाही, असेही अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले. पण लोकशाहीमध्ये जर विरोधकांना संपवून टाकले तर ती लोकशाही उरेल का? २०१५ सालीदेखील मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटकमध्ये रातोरात सरकार उलथवण्यात आले होते. आमदार, खासदार विकत घेऊन भाजपाचे मन भरले नाही म्हणून प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पाडली गेली. शिवसेना, तृणमूल काँग्रेस याचे उदाहरण आहे, असा आरोप आहे.