Abhijeet Dipke criticize PM Modi over Jantar Mantar protest blockades: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या या आंदोलनाला डाव्या विद्यार्थी संघटना, शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून मोठ्या संख्येने आंदोलक दिल्लीच्या दिशेने निघाले. आंदोलकांना अडविण्यासाठी दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेची तपासणी करून आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे. तर आज सायंकाळपासून दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात येणार आहे. या घडामोडींवर आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला असून पंतप्रधान मोदींनी अधिकृतरित्या आणीबाणी घोषित केली असल्याचे ते म्हणाले.

अभिजीत दिपके यांनी एक्सवर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. ते म्हणाले, “उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हजारो तरुणांना ताब्यात घेतले जात आहे. पंतप्रधान मोदी ही दहशत आता चालणार नाही. या देशातील तरुण आता तुम्हाला घाबरत नाही. मी उद्या दिल्लीत येत आहे. आम्ही जंतर-मंतरवर मोर्चा काढू, बघू काय होते ते.”

आज सकाळी माध्यमांशी बोलतानाही अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला. जम्मू-काश्मीरवरून सैन्य बोलावण्यात आले आहे. नक्षलग्रस्त भागातून सुरक्षा दल आणले आहे. तुम्हाला नेमकी भीती कशाची वाटते? तुम्हाला जर एवढी भीती वाटत असेल तर तुम्ही नेहमी देशाबाहेर जाता, तसे यावेळीही जा, अशी टीका दिपके यांनी केली.

दिल्ली ही पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची खासगी मालमत्ता नाही. दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे, मेट्रो आणि रस्ते बंद केले आहेत. आंदोलनाने लोकांना अडचण होणार आहे. तर सरकारने ही जी बंदी लादली आहे, त्यातून अडचण होणार नाही का? मी, सौरव आणि आशुतोष रांका दिल्लीत जाणार आहोत, आम्हालाही अटक करा, असा थेट आव्हान दिपके यांनी दिले.

देशात अधिकृत आणीबाणी घोषित

अभिजीत दिपके यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले की, पंतप्रधान मोदींनी देशात अधिकृत आणीबाणी घोषित केली आहे. यानंतर त्यांनी एक मीम शेअर करत पंतप्रधानांना टोला लगावला. “मेट्रो बंद, रेल्वे बंद, इंटरनेट बंद”, असे म्हणत त्यांनी ‘५० इंच विश्वगुरू महामानव’ असे कॅप्शन देऊन एक मीम शेअर केले आहे. ज्यात एक व्यक्ती घाबरत घाबरत पाणी पिताना दाखवला आहे. तसेच माध्यमांशी बोलत असताना दिपके म्हणाले की, जेव्हा भारतात आणीबाणी लादली गेली होती, तेव्हाही देशात ट्रेन बंद करण्यात आल्या नव्हत्या. मात्र या सरकारने ट्रेनही बंद केल्या आहेत.

अभिजीत दिपके यांचे सहकारी सौरव दास, आयसा संघटनेच्या अध्यक्ष नेहा बोरा यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत सरकारवर टीका केली आहे. “दिल्लीत २३ हजार सीएपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. हॉटेलची झडती घेतली जात आहे. इंटरनेट बंद केले आहे. एका आंदोलनाला सरकार इतकी का घाबरली आहे?”, असा प्रश्न नेहा बोराने उपस्थित केला आहे.

सम्राट घाबरला

सीजेपीचे सह-संयोजक सौरव दास यांनीही एक्सवरून पोस्ट शेअर करत रेल्वे गाड्या रद्द करण्याच्या निर्णयावर टीका केली. “सम्राट इतका घाबरला की, त्याने दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन रद्द केल्या. पण किती दिवस ते हे करतील. जागृत झालेला देश आपला संदेश पोहोचवण्यासाठी कोणता तरी मार्ग शोधेलच.