CJP Jantar Mantar Protest news update : कॉक्रोच जनता पार्टीने बुधवारी आपल्या मागण्यांची यादी जाहीर केली. यामध्ये चौथी मागणीही नमूद करण्यात आली आहे. आंदोलनाचे प्रवक्ते आशुतोष रँका यांनी जाहीर केलं की, २० जुलैच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांवर कोणतेही गुन्हे नोंदवले जाऊ नयेत किंवा कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाऊ नये, अशी नवीन मागणी आंदोलकांनी केली आहे.

कोणत्या चार मागण्या सरकारसमोर ठेवल्या

आंदोलकांना संबोधित करताना रँका म्हणाले की, या आंदोलनाच्या आता चार प्रमुख मागण्या आहेत. सोनम वांगचुक यांची सुटका करणे; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबांना १ कोटींची भरपाई देणे; २० जुलैच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शांततापूर्ण आंदोलकांवरील कायदेशीर कारवाई मागे घेणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

…तर आधी आम्हीच अटकेत जाऊ

“अनेक लोक चिंतेत होते की त्यांनी शांततेत आंदोलन करूनही त्यांना लक्ष्य केले जात आहे. आम्ही हे सुनिश्चित करू की शांततापूर्ण आंदोलकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. तुमच्या आधी आम्हीच अटकेत जाऊ”, असं रँका म्हणाले. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होऊनही ते अधिक व्यापक झाल्याचा दावा करत रँका म्हणाले, “आज आमच्या आंदोलनाचा ३२ वा दिवस आहे. या देशातील विद्यार्थ्यांना आंदोलन कसं करावं हे माहीत नाही असं म्हणणारे आता स्वतःच हे पाहू शकतात.”

सरकारला वाटलं होतं की आंदोलन थांबेल

२० जुलैच्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी आरोप केला की, प्रशासनाला वाटलं होतं की पोलिसांच्या कारवाईनंतर आणि तंबू ठोकण्यावर निर्बंध घातल्यानंतर हे आंदोलन संपेल. “या लोकांना वाटलं होतं की २० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला की आंदोलन संपेल. त्यांना वाटलं की ते तंबू लावू देणार नाहीत आणि आंदोलन संपेल. पण हे आंदोलन आता १०० पट मोठं झालं आहे”, असं ते म्हणाले. या आंदोलनाला निर्णायक लढाई संबोधत रँका म्हणाले, “ही लढाई सरकारच्या अहंकाराचा अंत करण्यासाठी आहे.” त्यांनी २० जुलैच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवरही टीका केली आणि म्हणाले, “त्या दिवशी दिल्ली पोलिसांनी जे काही केलं, ते संपूर्ण जगाने पाहिलं आहे.”

या आंदोलनाने सरकारला आपली भूमिका बदलण्यास भाग पाडलं असा दावा करत रँका म्हणाले, “आम्ही सरकारला झुकवलं आहे. जे सरकार आम्हाला कॉक्रोच आणि व्हायरस म्हणत होतं, आता जनता त्याच सरकारला प्रश्न विचारत आहे. हा आमच्या आंदोलनाचा विजय आहे.”