केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ६ जून रोजी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’तर्फे (CJP) एका मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ‘काय करावे आणि काय करू नये’ (Do’s and Don’ts) याची एक सविस्तर नियमावली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर जाहीर केली आहे. “या छोट्याशा थट्टेचे आता आंदोलनात रूपांतर करण्याची वेळ आली आहे,” असे दिपके यांनी म्हटले आहे.
विमानतळाऐवजी थेट जंतरमंतरवर येण्याचे आवाहन
यापूर्वी अभिजीत दिपके यांनी तरुणांना दिल्ली विमानतळावर एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र, नव्या सुचनेनुसार त्यांनी विमानतळावर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही. आंदोलकांनी ६ जून रोजी सकाळी ९ वाजता जंतरमंतरजवळील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन येथे थेट पोहोचायचे आहे.
आंदोलकांसाठी नियमावली – काय करावे?
- देशातील शिक्षण हक्क आणि समान संधीच्या संरक्षणासाठी हे आंदोलन असल्याने आंदोलकांनी सोबत राष्ट्रध्वज तिरंगा आणि कोणतेही एक पुस्तक सोबत बाळगावे.
- दिल्लीतील कडक उन्हाचा विचार करता आंदोलकांनी येताना सनस्क्रीन लावून आणि टोपी घालून यावे. तसेच स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाण्याची सोय करावी. “आपल्याला सूर्यासोबत जुळवून घ्यायचे आहे,” असे पक्षाने गमतीने म्हटले आहे.
- संपूर्ण आंदोलनाचे जबाबदार आणि शांततापूर्ण पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग (चित्रीकरण) करावे.
- आंदोलनात कोणतीही अनुचित घटना किंवा गैरवर्तन आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
काय करू नये?
- हे आंदोलन समुहाने अधिक मजबूत होते, त्यामुळे शक्यतो एकटे येऊ नका. मित्र किंवा कुटुंबासोबत या.
- “क्रांतीसाठी नाश्ता आवश्यक आहे,” असे सांगत आंदोलनात येण्यापूर्वी सर्वांनी घरून जेवून किंवा नाश्ता करून येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर फुले न फेकता, त्यांना आदरपूर्वक फुले देऊन देशाच्या भविष्याची काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आभार माना.
- आंदोलनादरम्यान ट्रोल करणाऱ्या किंवा चिथावणी देणाऱ्या व्यक्तींशी वाद घालू नका, कारण ते या कामात ‘व्यावसायिक’ असतात.
आंदोलनाचे मुख्य कारण काय?
NEET पेपर लीक प्रकरण आणि CBSE परीक्षेच्या निकालातील गोंधळामुळे देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. या शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी कारभाराला जबाबदार धरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार सौरव दास, चित्रपट निर्माती विजेता दहिया आणि आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषद घेतली. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून सर्वसामान्य विद्यार्थी, पालक आणि तरुणांसाठी खुले असल्याचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी स्पष्ट केले.
