कॉक्रोच जनता पार्टीने देशभरात केलेलं आंदोलन प्रचंड चर्चेत आलं. ३७ दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्री हे पद सोडावं लागलं. अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु होतं. सरकारने शिक्षण सुधारणा विधेयकही बुधवारी मंजूर करुन घेतलं. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता अभिजीत दिपकेंनी त्यांची भूमिका मांडली आहे. तसंच सरकारला एक इशाराही दिला आहे.

नव्या कायद्याबाबत काय म्हणाले अभिजीत दिपके?

पेपरफुटीबाबत सरकारने विधेयक आणलं आहे, पण मला असं वाटतं की विधेयकं येत राहतील. पण सरकारची नियत जोपर्यंत चांगली नाही तोपर्यंत गोष्टी बदलणार नाही. आपल्या देशात अनेक चांगले कायदे आहेत. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करु असं मोदींनी आश्वासन दिलं होतं. पहिल्या सुनावणीत काय झालं? पुढची तारीख मिळाली कारण सीबीआयचा अधिकारी उपस्थित राहिला नाही. कायदे आणून काय उपयोग त्या कायद्यांची अंमलबजावणी करणारं सरकार चांगलं हवं, असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे.

..तर आणखी तीव्र आंदोलन

विद्यार्थ्यांवरच्या FIR अद्याप मागे घेण्यात आलेल्या नाहीत याबाबत विचारलं असता दिपके म्हणाले, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन विषय संपला आहे असं जर सरकारला वाटत असेल तर तसं नाही, FIR मागे घेतल्या गेल्या नाहीत तर आम्ही यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करु. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मतांची भाषा कळते. मी त्यांना सांगू इच्छितो की एका विद्यार्थ्यावर लाठी किंवा गोळी चालवाल तर त्या घरात किमान चार मतं आहेत हे विसरु नका. एक काळ होता की अतिरेक्यांच्या विरोधात एके ४७ बंदुक वापरली जात होती. आता विद्यार्थ्यांना तशी वागणूक दिली जाते आहे. अजूनही सुधरण्याची वेळ आहे, सुधारा नाहीतर निवडणूक आल्यानंतर विद्यार्थी तुम्हाला सुधारतील.

जेन झींना गटरछाप म्हणणाऱ्या कंगना रणौत यांना दिपकेंचं उत्तर

कंगना रणौतला शेवटचं संसदेत कधी पाहिलं होतं? राजकारणाबाबत गंभीर असलेल्यांपैकी कुणी काही बोललं तर मला प्रतिक्रिया विचारा. पार्ट टाइम पॉलिटिक्स करणाऱ्यांबाबत मी बोलणार नाही असं म्हणत दिपके यांनी विषय संपवला.

CJP चे आशुतोष रांका यांनी नव्या विधेयकावर काय म्हटलंय?

CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी नव्या विधेयकावर भूमिका मांडली. जे नवं विधेयक आलं आहे त्यात पुन्हा हीच अडचण आहे. पेपरफुटी झाल्यानंतर काय करणार ते सरकार यातून सांगतं आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार काय करतं आहे ते काहीही सांगितलं गेलेलं नाही. जोपर्यंत तुम्ही NTA मध्ये सुधारणा करणार नाही, सगळ्या गोष्टींमध्ये पारदर्शकता आणणार नाही, काळ्या यादीतल्या व्हेंडर्सना कसं रोखणार, परीक्षा पद्धतींमध्ये काय सुधारणा आणणार तोपर्यंत पेपरफुटीची समस्या संपणार नाही. तु्म्ही फक्त हे सांगता आहात की पेपरफुटी झाल्यावर काय करणार, पेपरफुटी रोखण्यासाठी काय करणार हे सांगत नाही. असं म्हणत आशुतोष रांका यांनी विधेयकावर टीका केली आहे.