Sourav Das on Protest against ECI: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने आता दिल्ली पोलिसांना २४ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. “आम्ही कधी आंदोलन करू शकतो, याची वेळ आणि दिनांक सांगावी”, असे विधान कॉक्रोच जनता पार्टीचे सह-संयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी दिले आहे. तसेच माध्यमांशी बोलताना सौरव दास म्हणाले, “पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या अंहकारामुळे संपूर्ण देश पेटला आहे. जर आंदोलनच करू द्यायचे नसेल तर संविधानातील शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकारही काढून टाका.”
सौरव दास माध्यमांशी संवाद साधत असताना म्हणाले, आंदोलन करण्यासाठी पोलीस आंदोलकांना दहा दिवसांपूर्वी संपर्क साधण्यास सामान्यपणे सांगत असतात. त्यांची नेहमी तक्रार असते की, किमान १० दिवसांपूर्वी तुम्ही आंदोलनाची आगाऊ सूचना द्या. म्हणून आज आम्ही पोलिसांकडे जाऊन त्यांनाच आंदोलनाची तारीख आणि वेळ निश्चित करण्याची मागणी केली. तसेच पोलीस ही मागणी लांबवू शकत नाही, त्यांना २४ तासांच्या आत आम्हाला वेळ ठरवून द्यावी लागेल.
“जंतर-मंतरवर आंदोलन करण्याचा आमचा संविधानिक अधिकार आहे. संविधानाने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन शांततेत आंदोलन करू. यापूर्वी आम्ही जंतर-मंतरवर ३६ दिवस शांततेत आंदोलन करून दाखवले आहे. जे काही चुकीचे झाले, ते पोलिसांकडून झाले होते. संपूर्ण जगाने ते पाहिले होते. मुला-मुलींवर लाठीचार्ज केला गेला. त्यांना चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले. आताही दोन दिवसांपासून पोलीस अमानुष अत्याचार करत असल्याचे दिसत आहे. उजव्या विचारसरणीच्या लोकांना आंदोलनात घुसवले जात आहे. त्यांच्याकडून आंदोलकांना मारहाण केली जात आहे”, असा आरोप सौरव दास यांनी केला.
दोन लोकांच्या अंहकारामुळे देश पेटला
सौरव दास यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, दोन लोकांच्या अंहकारामुळे संपूर्ण देश पेटला आहे. या दोघांचे नियंत्रण सुटले आहे. आपण अशी व्यवस्था स्वीकारू शकतो का? मोदी-शाह मिळून देशातील युवकांविरोधात कट रचत आहेत.
तर संविधान बदलून टाका
जर आम्हाला आंदोलन करू द्यायचे नसेल तर भाजपाने संविधान बदलून दाखवावे. भाजपाकडून नेहमीच बहुमताचा राग आळवला जातो. आमच्याकडे अनेक राज्य आहेत. खासदार आहेत, असे ते सांगतात. मग तुमच्याकडे बहुमत असेल तर आंदोलन करण्याचा अधिकार संविधानातून काढून टाका, असे आव्हान सौरव दास यांनी भाजपाला दिले.
