नवी दिल्लीतील ‘जंतर मंतर’ या आंदोलनासाठी बंदी घातलेल्या मैदानात परवानगीशिवाय घुसून घोषणाबाजी करणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या संघटनेच्या तीन प्रमुख नेत्यांना दिल्ली पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे अशी या तीन नेत्यांची नावे असून, त्यांना आज मंदिर मार्ग येथील विशेष न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी या नेत्यांनी जंतर मंतर येथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.

पोलिसांनी कारवाई का केली?

मंगळवारी पहाटे या तीन नेत्यांनी दिल्ली पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून जंतर मंतर परिसरात बेकायदेशीर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जंतर मंतर हे आता आंदोलनासाठी अधिकृत स्थळ राहिलेले नसतानाही त्यांनी तेथे घोषणाबाजी केली. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

याप्रकरणी पोलिसांनी या तिघांविरुद्ध खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे:

  • अनधिकृत प्रवेश
  • प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन
  • शांतता कराराचा भंग
  • सरकारी कामात अडथळा आणणे

कायद्यानुसार, स्थानबद्धतेच्या कारवाईत पोलिसांना कोणत्याही वॉरंटशिवाय संशयिताला ताब्यात घेता येते, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. या कारवाईनंतर कोणत्याही व्यक्तीला दंडाधिकाऱ्यांच्या मंजुरीशिवाय २४ तासांपेक्षा जास्त वेळ ताब्यात ठेवता येत नाही.

अभिजित दिपकेंचे गंभीर आरोप

सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यातील या तीन नेत्यांचा एक फोटो शेअर केला आहे. “स्थानबद्ध करण्यात आले असले तरी या नेत्यांचे मनोबल खचलेले नाही,” असे दिपके यांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे सीजेपी नेत्या रत्ना सिंह यांनी आरोप केला की, “या तिघांना मंगळवारी पहाटे ३ वाजता पोलिस ठाण्यात आणण्यात आले आणि त्यांना त्यांच्या वकिलांशी संपर्क साधू दिला गेला नाही. आज आशुतोष रांका यांचा वाढदिवस असूनही त्यांना सकाळपासून अशा प्रकारे डांबून ठेवण्यात आले आहे.” त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावून तिहार तुरुंगात पाठवले जाण्याची शक्यताही पक्षाने व्यक्त केली आहे.

यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनादरम्यानही आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

आंदोलनाचे मुख्य कारण काय?

राजधानी दिल्लीत सध्या निवडणुक आयोगाविरोधात सीजेपीसह इतर संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.