CJP Parliament March sees Abhijeet Dipke issuing an emotional statement : दिल्लीत काल देशभरातील तरुणांचा आक्रोश पाहायला मिळाला. सुरक्षा जवानांनी केलेला लाठीमार आणि अश्रुधुराचा माराही संतप्त तरुण वर्गाला थोपवू शकला नाही. त्यामुळे सोमवारी दिवसभर राजधानी दिल्ली तणावाखाली राहिली. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे अनेक आंदोलक जखमी आहे. या जखमी आंदोलकांशी आज अभिजीत दिपके यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काल झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली. याबाबत त्यांनी एक्स पोस्टही केली आहे.

“मी आमच्या सर्व समर्थकांची, विशेषतः पुरुष पोलीस अधिकाऱ्यांकडून अमानुषपणे मारहाण झालेल्या मुलींची माफी मागतो. आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. दिल्ली पोलिसांच्या या अमानुष कृत्यांपासून तुमचं रक्षण करण्यासाठी मी अधिक प्रयत्न करू शकलो असतो”, असं अभिजीत दिपके म्हणाले.

आम्ही तुम्हा सर्वांसाठी लढत राहू

“२० हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या एका धर्मेंद्र प्रधानला वाचवण्यासाठी सरकार आणखी अनेक तरुण विद्यार्थ्यांचे रक्त सांडायला तयार होते. जर तुम्ही जखमी झाला असाल आणि हा संदेश पाहत असाल, तर कृपया मला DM करा. मला तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलायचं आहे आणि तुमची माफी मागायची आहे. आम्ही तुमच्या सर्वांसाठी लढत राहू”, असं अभिजीत दिपके म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर टीका केली. ते म्हणाले, “अत्यंत क्रुरतेने दिल्ली पोलिसांनी तरुणांना मारलं आहे. १२-१२ वर्षांच्या मुलांचं डोकं फोडलं आहे. दिल्ली पोलिसांनी एका मुलीचे कपडे फाडले, तिच्या छातीवर पाय दिला आहे. दिल्ली पोलिसांना नेमके कसले आदेश होते? मुलांची हत्या करण्याचे आदेश होते का?”

एक मुलगी गंभीर जखमी

“अधिक मुलं जखमी व्हावीत, असं आम्हाला वाटत नव्हतं म्हणून आम्हाला आमचं कालचं आंदोलन स्थगित करावं लागलं. सरकारला मुलांच्या आयुष्याची काळजी नाही, हे काल समजलं. ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसांनी मुलांवर लाठीमार केला, डोकं फोडलं होतं, त्यांना आदेश आले होते का कोणाचा जीव गेला तरी चालेल? मोर्चाला अडवायचंच होतं ते पाण्याचा फवाराही करू शकले असते, मुलंच तर होती. पण १७-१८ वर्षांच्या मुलांवर हल्ला झाला. महिनाभर शांततेत आंदोलन केलं आम्ही, पण काल पहिल्यांदा दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला. एक मुलगी अद्यापही रुग्णालयात गंभीर जखमी आहे. तिच्या गळ्यावर लाठीने मारण्यात आलं, त्यानंतर ती मुलगी खाली कोसळली परिणामी तिथे चेंगराचेंगरी झाली”, अशी माहिती अभिजीत दिपके यांनी दिली.

जंतर-मंतर परिसरात दगडाने भरलेले ट्रक कुठून आले?

“१५० पेक्षा जास्त विद्यार्थी रुग्णालयात दाखल आहेत. दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदींच्या आदेशांचं पालन केलं आहे, ही लोकशाही नाहीय. इथं ट्रकभरून दगडं का आली आहेत? आमच्या प्रत्येक आंदोलकांची बॅग तपासल्या जात आहेत. अशा परिस्थितीत जंतर मंतर परिसरात दगडांनी भरलेले ट्रक कुठून आले याचं उत्तर पोलिसांनी द्यावं”, असा सवालही अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला.

अमित शाहांनी प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून थांबवून ठेवलं

दरम्यान, अमित शाहांच्या घराबाहेर आमच्या प्रतिनिधींना अडवून ठेवण्यात आलं. चर्चेसाठी बोलावल्यानंतर त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले, असं म्हणत अभिजीत दिपके म्हणाले की, पोलिसांना नेमप्लेट काढून टाकून मुलांवर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते, असाही गंभीर आरोप त्यांनी केला. दरम्यान, आजही हे आंदोलन सुरूच राहणार असून सरकारला आता आमच्याशी चर्चा करायची असेल तर त्यांनी जंतर-मंतरवर यावं, आम्ही कुठेही येणार नाही, असा निश्चयही त्यांनी बोलून दाखवला.