संसदेकडे काढण्यात आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चात देशभरातून विद्यार्थी, पालक, शिक्षक, डिलिव्हरी एजंट, आर्किटेक्टस आणि अनेक तरुण जंतर मंतर येथे सहभागी झाल्याचे दिसले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आवाहनानुसार २० जुलै अर्थात सोमवारी मोठ्या संख्येनं सीजेपीचे आंदोलक संसदेच्या दिशेनं निघाले. वाटेत दिल्ली पोलिसांच्या रॅपिट अॅक्शन फोर्सकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्याशिवाय संसद भवन परिसरात पोहोचलल्या आंदोलकांवरदेखील लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक आंदोलक जखमीही झाले. या आंदोलकांमध्ये फक्त नीट परीक्षार्थीच नसून सर्वच स्तरातील नागरिक सहभागी झाल्याचं दिसून आलं. इंडियन एक्स्प्रेसनं या वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या आंदोलकांच्या नेमक्या भूमिका सविस्तर जाणून घेतल्या.

जंतर मंतर येथील मोर्चासाठी सर्वात अगोदर पोहोचणाऱ्यांपैकी एक होत्या दिल्लीच्या शाहदरा येथील दीपा (४२). त्या आपल्या पती आणि तीन मुलांसह सकाळी साडेसहाच्या सुमारास जंतरमंतरवर पोहोचल्या. त्या म्हणाल्या, “माझी २ मुले १० वी आणि १२ वीत सरकारी शाळेत शिकत आहे. त्यांचं भविष्य पणाला लागले आहे. आम्हाला शिक्षण पद्धतीत असा बदल हवा आहे ज्यामुळे श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही वर्गांतील मुलांना शिक्षणाची समान संधी मिळाली, तरच बदल घडून येऊ शकेल.”

आम्ही पोलिसांच्या परवानगीसाठी संध्याकाळपर्यंत थांबायला तयार आहोत. जर आम्ही घाबरलो असतो, तर इथे का आलो असतो? असे दीपा यांचे पती प्रल्हाद (४६) यावेळी म्हणले. आयआयटी-जेईई परीक्षेची तयारी करत असलेल्या त्यांच्या मुलाने सांगितले की, त्याची मोठी बहीण जंतर मंतर येथे स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. “तिच्याकडून आम्हाला कळते की तिथे रोज रात्री गर्दी वाढत चालली आहे.”

दिल्लीच्या शाहदरा येथील दीपाचे कुटुंब. (Express photo)

पेशाने अभिनेता आणि शिक्षक असलेला मुंबईतील उजय म्हणाला, त्याला या मोर्चाबाबत इन्स्टाग्रामवरून कळाले. “सुरुवातीला मला या प्रकरणाची पूर्ण कल्पना नव्हती, पण नंतर मी माझ्या मित्रांशी चर्चा केली. मंत्र्याने राजीनामा द्यावा, या मताचे ते नव्हते. पण मला वाटते की, आपल्या देखरेखीखाली काही घडले असेल तर त्याची जबाबदारी घेणे ही चांगली गोष्ट आहे. नाहीतर अशा गोष्टी घडतच राहतील,” असे तो म्हणाला. पुढे तो असेही म्हणाला, “इतक्या मोठ्या संख्येने लोक जमले आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे, पण इतकी कडक सुरक्षा व्यवस्था पाहून भीतीही वाटते. लोकांची सुरक्षा करणे हेच त्यांचे मुख्य कर्तव्य आहे”.

दिल्लीतील एका आर्किटेक्ट तरुणाला प्रश्न पडला की, संसदेकडे मोर्चा काढण्यासाठी मुळात पोलिसांच्या परवानगीची गरजच का होती? “मोर्चा काढण्यासाठी आपल्याला परवानगीची गरज का आहे? तेही ज्यांच्या विरोधात आपण मोर्चा काढत आहोत त्यांची. हा आपला मूलभूत अधिकार आहे.”

उजय, दुष्यंंत, अभय (Express photo)

जयपूरवरून जंतरमंतरवर आलेले ४० वर्षीय आर्किटेक्ट दुष्यंत म्हणाले, “आमच्या पिढीने जे प्रश्न विचारले नाहीत ते प्रश्न हे तरुण विचारत आहेत. आंदोलन करणे हा आपला घटनात्मक अधिकार असताना त्यासाठी परवानगीची गरज का आहे? असा प्रश्न ते करत आहेत. जरी परवानगी मिळाली नाही तरीही आपण तिथे उपस्थित राहिले पाहिजे.”

उत्तर प्रदेशातील बरेलीवरून १९ वर्षीय ब्लिंकिट डिलिव्हरी एजंट निखिल आणि अनिल तसेच त्यांचा सहकारी रंजन हे आले होते. “आम्ही इथे आलो आहोत कारण नीट पेपरफुटीमुळे २० विद्यार्थ्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. भविष्यात असे पुन्हा घडू नये यासाठी आम्ही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मागणी करत आहोत. आमचे आयुष्य खूप अनिश्चित आहे कारण आम्ही दिवसभर गाडी चालवून डिलिव्हरी देण्याचे काम करतो. एखाद्या व्यक्तीचे आयुष्य किती महत्त्वाचे आहे, हे आम्हाला माहीत आहे”, असे रंजन म्हणाला.

रंजन, अमित, नितीन (Express photo)

जंतर मंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. संसदेकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. सीजेपीचे नेते मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी पोलिसांशी चर्चा करत होते. मात्र परवानगी नसतानाही आंदोलनकर्त्यांचा उत्साह कायम असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले.