CJP protest leader Ajinkya Shinde : कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता या आंदोलनाचं नेतृत्व महाराष्ट्रातील तरूण अजिंक्य शिंदे यांच्याकडे देण्यात आलं आहे. याबद्दलची घोषणा स्वतः दिपके यांनी आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओतून केली. दरम्यान, आता अजिंक्य शिंदेची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्याने तरुणांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. अजिंक्य यांनी यासंदर्भातील व्हिडिओ प्रदर्शित केला आहे.
अजिंक्य शिंदे हे कॉक्रोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटना प्रभारी आहेत. सध्या अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात असल्याने दिल्लीतील आंदोलनाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. अजिंक्य शिंदे म्हणाले, “तुम्हाला माहित आहे की अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना या हुकुमशाही सरकारने दिल्ली विमानतळावरच ताब्यात घेतलं. हे हुकुमशाही सरकार या देशातील एकजुटीला घाबरले आहेत. गेल्यावेळी हा संपूर्ण देश एकत्र येत जंतरमंतवर आला होता तेव्हा मोदी- शाहाच्या जोडीचा अहंकार चिरडला गेला. आताच्या आंदोलनावेळी लोक जंतर मंतरपर्यंत पोहोचू नये म्हणून सरकारने ट्रेन, बस बंद केल्या आहेत.”
“जिथून लोक येत होते, त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. अर्धी लढाई आम्ही जिंकलो आहोत. आता एका नव्या लढाईला सुरुवात होत आहे”, असंही अजिंक्य शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “आम्ही काय मागत होतो? या देशातील नागरिकांचा मत करण्याच्या अधिकाराची चोरी झाली आहे. ज्यांनी मतचोरी केली, त्या ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घ्यावा हेच मागत होतो. पूर्ण दिल्लीत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. “
“माझं सर्वांना निवेदन आहे, तुम्ही सर्वांनी जंतर मंतरच्या दिशेने कूच करावी. जिथं पोलीस तुम्हाला अडवतील तिथंच तुमचं जंतर मंतर तयार करा. जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाही, तोवर ही लढाई सुरू राहणार”, असा ठाम निर्धारच अजिंक्य शिंदे जाहीर केला.
कोण आहेत अजिंक्य शिंदे?
महाराष्ट्राचे असलेले अजिंक्य शिंदे हे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे राष्ट्रीय संघटना प्रभारी आहेत. मुंबईत नुकत्याच झालेल्या सीजेपीच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात अजिंक्य यांचा मुख्य सहभाग होता. मुंबईतील आंदोलनानंतर सीजेपीचा मुख्य चेहरा म्हणून अजिंक्य शिंदे समोर आले आहेत. देशातील सरकारी शाळांची अवस्था सुधारण्यासाठी सीजेपीने चालवलेल्या राष्ट्रीय मोहिमेचे नेतृत्व अजिंक्य यांनी केले होते. आपल्या आक्रमक आणि मुद्देसूद मांडणीमुळे अजिंक्य यांचा तरुण वर्गात मोठा प्रभाव असून, इन्स्टाग्रामवर त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत. गांधी जयंतीदिनी दादर येथे विनापरवाना एकत्र येऊन घोषणाबाजी केल्याप्रकरणी अभिजित दीपके आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह इतर ४०० कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
