CJP Delhi Protest Petition Delhi High Court: NEET पेपर फुटीप्रकरणी निषेध नोंदवत CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेने दिल्लीत मोठं आंदोलन सुरू केलं. त्याला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आधी समर्थन दिलं व नंतर ते स्वत:च बेमुदत उपोषणाला बसले. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार २० जुलै रोजी दिल्लीतील जंतरमंतरपासून थेट संसद भवनापर्यंत सीजेपीच्या आंदोलकांनी मोर्चा काढला. यात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बळाचा वापर करून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर देशभरात विविध स्तरांतून परखड टीका करण्यात येत आहे. मात्र, एकीकडे देशात संतापाचं वातावरण असताना दुसरीकडे या मोर्चावर गंभीर आरोप करत त्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
२० जुलैच्या आदल्या दिवशी म्हणजेच १९ जुलै रोजी सकाळी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलसांनी रॅपिड अॅक्शन फोर्स अर्थात शीघ्र कृती दलाच्या मदतीने सक्तीने आंदोलनस्थळावरून हटवून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली पोलिसांची ही कृती रास्तच होती, अशी पुष्टी नंतर न्यायालयाने दिली. आता २० जुलै रोजी सीजेपीच्या आंदोलकांनी काढलेल्या मोर्चाच्या विरोधात गंभीर आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर उद्या, अर्थात २४ जुलै रोजी तातडीची सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.े
CJP विरोधातील याचिकेत नेमके कोणते आरोप?
दिल्ली उच्च न्यायालयात सीजेपीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये २० जुलैच्या मोर्चावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच, या सर्व आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण तपासासाठी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्यात यावं, अशी मागणीदेखील याचिकेत करण्यात आली आहे. सदर याचिका अखिल भारत हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीष कुमार अगरवाल यांनी दाखल केली आहे.
याचिकेत CJP वर करण्यात आलेले आरोप…
१. २० जुलै रोजीचा मोर्चा हा एका मोठ्या कटाचा भाग होता. या कटासाठी विदेशी घटकांचं आर्थिक समर्थन व राजकीय शक्तींचा हस्तक्षेप होता.
२. या मोर्चादरम्यान संपूर्ण दिल्लीला ताब्यात घेण्यात आलं होतं, सगळे रस्ते बंद करण्यात आले होते, नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
३. हे आंदोलन मुळात NEET पेपरफुटीपासून सुरू झालं होतं, पण नंतर ते राजकीय निदर्शनांमध्ये रुपांतरीत झालं.
४. २० जुलैच्या मोर्चामध्ये हिंसा, सामाजिक जीवनात अडथळे, पत्रकारांवर हल्ले, सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान, संसद भवनाची सुरक्षा भेदणे व पोलिसांना जखमी करणे असे प्रकार घडले.
५. या सगळ्या घटनांमुळे सदर मोर्चाचे आयोजक, सहभागी आंदोलक व एखादी विदेशी शक्ती सहभागी असल्यास त्याची सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
६. सोनम वांगचुक यांचे काही विदेशी संघटनांशी लागेबांधे असून या बाजूचाही चौकशीत विचार केला जावा. पहिल्या पत्नीशी झालेल्या विवाहानंतर त्यांना अनेक विदेशी संस्थांकडून समर्थन मिळालं आहे. त्यामुळे या प्रकरणात या बाजूचा विचार होणं गरजेचं आहे.
७. आर्थिक घटकांचा पुरेपूर वापर करून देशात अस्वस्थिरता निर्माण करण्यासाठी काही देशविघातक शक्ती व विदेशी घटकांनी मिळून रचलेला हा एक मोठा कट वाटत आहे.
८. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्या मागणीसाठी सुरू झालेल्या या आंदोलनात आता अशी मंडळी सहभागी झालेली दिसत आहेत, ज्यांचा उद्देश हा देशविरोधी असल्याचं दिसत आहे.
९. काश्मीर हा भारताचा भाग नसल्याची भूमिका मांडणाऱ्या अरुंधती रॉय यादेखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे या आंदोलनाच्या हेतूबद्दलच शंका निर्माण होत आहे.
१०. अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेऊन हे आंदोलन प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे.
