Arundhati Roy critical statement on PM Narendra Modi: “कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दशकांहून अधिक काळ जपलेली सार्वजनिक प्रतिमा दोन आठवड्यात धुळीस मिळाली”, असे विधान प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी केले आहे. तसेच कोणत्याही निवडणुकीतील विजयापेक्षा या आंदोलनाने मोठा राजकीय धक्का दिला आहे, असेही अरुंधती रॉय म्हणाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
‘मदर मेरी कम्स टू मी’ या पुस्तकाच्या ‘मेरी माँ, मेरी गँगस्टर’ नावाच्या हिंदी अनुवादाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत असताना रॉय यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केले. “निवडणुकीतील जय-पराजय हा राजकारणाचा एक पैलू असला तरी अलीकडे झालेल्या जनआंदोलनाने दाखवून दिले की, अनेक दशकांपासून पेरलेल्या विचारसरणीला काही आठवड्यांतच हादरे बसू शकतात”, असे विधान रॉय यांनी केले.
‘दोन आठवड्यातच हादरे बसले’
अरुंधती रॉय पुढे म्हणाल्या, “मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे आपल्या देशाचे पुढे काय होणार, हे कोणालाच माहीत नाही. कदाचित त्याची पटकथा लिहिली जात असेल आणि प्रत्येकाची त्यात स्वतःची अशी भूमिका आहे. लोकांना वाटायचे की, आपल्याला हजार वर्ष त्याच परिस्थितीत राहावे लागेल. पण दोन आठवड्यांतच परिस्थिती मुळापासून हादरली.”देले
‘झुरळांनी दोन आठवड्यात प्रतिमा उद्ध्वस्त केली’
पंतप्रधान मोदी यांनी १२ वर्षांच्या कार्यकाळात एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही. याचाही उल्लेख अरुंधती रॉय यांनी केला. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी यांनी साधी पत्रकार परिषदही कधी घेतली नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून गेल्या २४ वर्षांत त्यांची प्रतिमा घडवली गेली. काही लोक त्यांना विष्णूचा अवतार म्हणतात. मात्र झुरळांनी अवघ्या दोन आठवड्यात त्यांची २४ वर्षांची प्रतिमा उद्ध्वस्त केली.”
‘हे आव्हान इथेच संपलेले नाही’
हा निवडणूक जिंकण्यापेक्षाही मोठा विजय आहे, असे सांगताना बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका अरुंधती रॉय पुढे म्हणाल्या, सरकारने यापुढेही महत्त्वाच्या संस्था आणि त्याचे सूत्रे स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तर हे आव्हान इथेच संपले आहे, असे बिलकुल समजू नये. “सरकारने यापुढे संस्था आणि सत्तेची सूत्रे आपल्या मुठीत ठेवली तर आपल्यासाठी खूप अवघड जाईल. विरोधी पक्ष आणि नागरी समाजाने लोकशाही संस्थाचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन काम करायला हवे”, असे आवाहनही रॉय यांनी केले.
अरुंधती रॉय यांनी यावेळी विरोधकांना जंतर-मंतरवरील आंदोलकांकडून धडा घेण्याचे आवाहन केले. या आंदोलनात सहभागी झालेले तरुण प्रत्येक मुद्दयावर एकमेकांशी सहमत नसतानाही त्यांनी परिपक्वता दाखवली. त्यांनी आपली भूमिका अत्यंत जबाबदारीने पार पाडली, असे त्या म्हणाल्या.
