Delhi Police denied permission to CJP Jantar Matar Protest: CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीने १० ऑक्टोबर अर्थात शनिवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं तरुण जंतरमंतरच्या दिशेनं निघालेदेखील आहेत. मात्र, एकीकडे सीजेपीकडून आंदोलनाची पूर्ण तयारी केली जात असताना दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी मात्र आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता उद्या प्रत्यक्ष जंतरमंतरवर नेमकी काय परिस्थिती उद्भवणार आहे, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपकेंनी आंदोलनासाठी परवानगीची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दिल्ली पोलिसांनी का नाकारली परवानगी?
सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यामागे नियमाचं कारण दिल्ली पोलिसांकडून देण्यात आलं आहे. यासंदर्भात दिल्लीच्या पोलीस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “७ ऑक्टोबर २०२६ रोजी सीजेपीचे सहसमन्वयक सौरभ दास यांनी जंतरमंतरवर आंदोलनासाठी परवानगी अर्ज दिला. या अर्जात सीजेपी १० ऑक्टोबरला मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. पण अर्जाची छाननी केली असता, हा अर्ज विहीत कालावधीमध्ये देण्यात आलेला नसल्याचं निदर्शनास आलं आहे”, असं निपूर प्रसाद यांनी नमूद केलं आहे.
“आंदोलनासाठी परवानगी देण्यासंदर्भातील सध्याच्या नियमावलीनुसार, जंतरमंतरवर कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भातील अर्ज हा प्रत्यक्ष तारखेच्या किमान १० दिवस आधी सादर करणं आवश्यक आहे”, असं म्हणत नुपूर प्रसाद यांनी नियमावर बोट ठेवलं आहे.
CJP च्या आधीच्या आंदोलनातील वर्तनावर बोट!
दरम्यान, यावेळी पोलीस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी याआधी सीजेपीनं जंतरमंतरवर केलेल्या आंदोलनात आंदोलकांकडून करण्यात आलेल्या वर्तनावर आक्षेप घेतला आहे. “एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, याआधी इतर काही प्रसंगी सीजेपीकडून करण्यात आलेलं वर्तन लक्षात घेता त्यांना देण्यात आलेल्या कायदेशीर सूचनांचं पालन करण्यात आलं नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे विहीत प्रक्रियेचं पालन न केल्यामुळे, याआधी दिलेल्या कायदेशीर सूचनांचं पालन न केल्यामुळे आणि सध्याची कायदा व सुरक्षेची परिस्थिती पाहता, वाहतुकीसंबंधीचे नियम पाहता CJP ला जंतरमंतरवर आंदोलनाची परवानही नाकारण्यात येत आहे”, असं नुपूर प्रसाद यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
अभिजीत दिपकेंचं म्हणणं काय?
दरम्यान, CJP चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावर टीका केली आहे. “१३ कोटी मतदार वगळण्यापूर्वी ज्ञानेश कुमार यांनी परवानगी घेतली होती का? सर्वोच्च न्यायालयानं तर फॉर्म ६ मध्ये बदलाची परवानगीही दिली नव्हती. कलम १९ नुसार आम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे. जंतरमंतर आंदोलनासाठीच राखीव ठेवण्यात आलं आहे. मग आंदोलनासाठी वेगळ्या परवानगीची गरज काय?” असा सवाल अभिजीत दिपकेंनी उपस्थित केला आहे.
