CJP Protest Modi Shah update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने १० ऑक्टोबर रोजी जंतर मंतर येथे आंदोलन पुकारलं होतं. मात्र या आंदोलनास्थळी पोहोचण्याआधीच अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतलं. त्यानंतर जवळपास २४ तास त्यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकला नाही. अखेर, आज सकाळी विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. जामीन मंजूर केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आता अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. सरकारने आपल्याच नागरिकांमध्ये युद्ध सुरू केल्याचं सौरव दास म्हणाले. तर, ही लढाई आता खऱ्या अर्थाने सुरू झाल्याचं आशुतोष रांका यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अभिजीत दिपके आज आजीच्या अंतिम दर्शन आणि अंत्यविधीसाठी घरी परतत असल्याने ते पत्रकार परिषदेत उपस्थित राहू शकले नाहीत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आपले आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सीजेपी (CJP) नेत्यांनी रविवारी व्यक्त केला. दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईदरम्यान, “ही लढाई आता सुरू झाली आहे,” असं त्यांनी म्हटलं. सुरक्षा व्यवस्थेवर टीका करताना त्यांनी सांगितलं की, परिस्थितीला युद्धासारखे स्वरूप येऊ दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लाज वाटली पाहिजे.
“नरेंद्र मोदी हे लाज आणत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ज्याप्रमाणे परिस्थिती निर्माण केली गेली, त्यामुळे त्यांनी देशाची इज्जत घालवली आहे. ते पंतप्रधान म्हणून लाज आणत आहेत. हजारोच्या संख्येने देशभरात लोकांना ताब्यात घेण्यात आलं. आंदोलनकर्त्यांना उचललं गेलं, त्यांना मारण्यात आलं. परिस्थिती एवढी वाईट केली आहे की मोदी आणि शाहांनी आम्हाला विमानातून किडनॅप केलं”, असा दावा आशुतोष रांका यांनी केला.
१९७५ च्या आणीबाणीविषयी आपण ऐकलं आहे. पण गेल्या ७२ तासांत नरेंद्र मोदींनी आणीबाणीलाही मागे सोडलं. कारण त्या आणीबाणीत ट्रेन बंद करण्याची वेळ आली नव्हती. काल शेकडोने ट्रेन बंद केल्या. लाखोच्या संख्येने लोकांना त्रास दिला, असंही आशुतोष रांका म्हणाले.
“जी लढाई निवडणूक आयोगाविरोधात होती, ज्ञानेश कुमारांविरोधात होती, ती लढाई आता नरेंद्र मोदी आणि अमित शाहांविरोधात झाली आहे. नरेंद्र मोदींनी हे स्पष्ट केलंय की ते काहीही करून ज्ञानेश कुमारांना वाचवणार. निवडणूक आयुक्तांची जबाबदारी आहे की लोकशाही पुढे नेण्याची, पण ते भाजपाबरोबर काम करत आहेत. फक्त भाजपाला जिंकवण्यासाठी असे आयुक्त काम करत आहेत”, अशी टीका आशुतोष रांका यांनी केली.
