दिल्लीतील जंतरमंतर येथे १० ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित असलेल्या आंदोलनासाठी निघालेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलकांना मध्य प्रदेश पोलिसांनी वाटेतच रोखले. भोपाळ, इटारसी आणि ग्वाल्हेर स्थानकांवर ही कारवाई करत सुमारे ३० जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यामध्ये महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधून दिल्लीकडे जाणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
पुण्याहून निघालेल्या २१ जणांना इटारसीत रोखले
गुरुवारी गोवा एक्सप्रेसमधून पुण्याहून दिल्लीला निघालेल्या आंदोलकांच्या एका गटाला इटारसी येथे रेल्वे पोलिसांनी उतरवले. मोठ्या संख्येने तरुण दिल्लीला जात असून, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत २१ जणांना ताब्यात घेऊन एका हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांना पुण्याला परत जाण्यास सांगण्यात आले.
दिल्लीतील आंदोलनासाठी निर्बंध
‘कॉक्रोच जनता पार्टी’ने मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगत दिल्लीतील प्रशासन आणि पोलिसांनी जमाव जमण्यावर निर्बंध लागू केले आहेत. दिल्लीला थांबा असलेल्या काही रेल्वेगाड्यांवर निर्बंध आणि दिल्ली मेट्रोच्या काही स्थानकांवरील बंदीमुळेही वाद निर्माण झाला आहे. दिल्लीला जाणाऱ्या आंदोलकांना रोखले जात असल्याचा आरोप विद्यार्थी कार्यकर्त्यांनी केला आहे.
‘देशभरातून हजारो जणांना ताब्यात घेतले’
‘सीजेपी’चे आशुतोष रांका यांनी गुरुवारी रात्री देशभरातून हजारो लोकांना ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. मात्र, या दाव्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. मध्य प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने किमान ३० आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.
