लडाखचे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिध्द शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत, आपल्या २६ दिवसांच्या उपोषणाची सांगता करतानाचे फोटो प्रसिद्ध करून दिलेले वचन मोडल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे “सर्वच राजकीय नेत्यांवरील आपला विश्वास उडाला आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वांगचुक यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी उपोषण सोडतानाचे फोटो तातडीने प्रसिद्ध न करण्याचे आश्वासन दिले होते. विरोधी पक्षांचे नेते आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनाही या घोषणेत सहभागी करून, संयुक्त स्वरूपात माहिती जाहीर करण्याची वांगचुक यांची इच्छा होती.

पाचच मिनिटांत फोटो प्रसिद्ध

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, करार झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याचे उल्लंघन झाल्याचे वांगचुक यांनी सांगितले. “मी इतर पक्षांच्या नेत्यांची चित्रे गोळा करण्याची वाट पाहत होतो; तितक्यात अवघ्या पाच मिनिटांत आयबीचे (IB) वरिष्ठ अधिकारी धावत आले आणि म्हणाले, ‘सर, मला माहिती नाही कसे, पण हे फोटो वृत्तवाहिन्यांवर सुरू झाले आहेत,'” अशी आठवण त्यांनी सांगितली.

“मंत्र्यांसोबत त्यांचे छायाचित्रकार आले होते. त्यांनी फोटो प्रसिद्ध करणार नसल्याचे वचन दिले होते, मात्र ते वचन पाळले गेले नाही,” असा आरोप वांगचुक यांनी केला. आंदोलन संपवताना सरकारच्या प्रतिनिधींनी ज्यूस किंवा सूप देऊन उपोषण सोडवण्याची परंपरा असल्याचे सांगत, हा कार्यक्रम केवळ सत्ताधारी पक्षाशी जोडला जाऊ नये, अशी आपली भूमिका होती; असेही त्यांनी स्पष्ट केले.

वांगचुक यांच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत उपस्थित असलेल्या गुप्तचर विभागाच्या (IB) अधिकाऱ्यांनाही या समजुतीचे साक्षीदार ठेवण्यात आले होते. “आंदोलनातील नेते आणि विद्यार्थी प्रतिनिधी या क्षणाचे साक्षीदार असावेत, ही माझी इच्छा होती. हा सर्वपक्षीय आणि संयुक्त प्रयत्न दिसावा, यासाठी मी आग्रही होतो,” असे वांगचुक यांनी नमूद केले.

‘गुप्त करारा’चे आरोप फेटाळले

दरम्यान, सरकारसोबत ‘मध्यरात्रीचा गुप्त करार’ करून उपोषण मागे घेतल्याच्या आरोपांना वांगचुक यांनी पूर्णपणे फेटाळून लावले. “मला जर तडजोड करायची असती, तर ती खूप आधीच करता आली असती. त्यासाठी २६ दिवस उपोषण करण्याची गरज नव्हती. मला थेट शिक्षणमंत्री पद मागण्याचीही संधी होती. जर डील करायची असती, तर माझ्याकडे अनेक पर्याय उपलब्ध होते,” असे रोखठोक उत्तर त्यांनी दिले.

आंदोलनाची पार्श्वभूमी

NEET परीक्षेच्या मुद्द्यावरून सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर उपोषण सुरू केले होते. प्रकृती खालावल्यानंतर १८ जुलै रोजी पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात हलवले. या कारवाईला विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला होता.

त्यानंतर वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. २१ जुलै रोजी वांगचुक यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले बोते. तिथे २४ जुलैच्या रात्री केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी त्यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीविरोधी कडक कायद्याचे आश्वासन दिल्यानंतर वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी सूप देऊन उपोषण सोडवल्याचे फोटो समोर आले आणि वादाला तोंड फुटले.