CJP Protest Streets Again update : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना शनिवारी १० ऑक्टोबर रोजी पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतलं. जंतर मंतरच्या दिशेने आंदोलनाच्या हेतून जाणाऱ्या या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर ते दिवसभर संपर्काच्या बाहेर होते. आज सकाळी त्यांना विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर सोडून देण्यात आलं. दरम्यान, वर्षभर देशात शांततेचा भंग करणार नाही, या अटीवर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती सीजेपीची कायदेशीर सल्लागार रत्ना सिंग यांनी दिली. दरम्यान, अभिजीत दिपके यांनी यासंदर्भात आता महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

“अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना १० ऑक्टोबर रोजी बीएनएसएसच्या कलम १२६/१७० अन्वये प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली होती. सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन करून, त्यांना आज दिल्ली कँट येथील एसईएम न्यायालयात हजर करण्यात आले. एक वर्षाच्या कालावधीसाठी शांतता आणि चांगल्या वर्तणुकीची हमी म्हणून ५० हजार रुपयांचा जामीन अर्ज भरण्यात आला आणि एसईएम न्यायालयाने त्यांची सुटका केली”, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

सुटका झाल्यानंतर अभिजीत दिपके त्याच्या गावी परतले आहेत. त्यांच्या आजीचं निधन झाल्याने अंत्यदर्शनाला ते छत्रपती संभाजीनगर येथे गेले असून आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, वर्षभरासाठी शांतता करार केल्याने ते आता आंदोलन करणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र यावर त्यांनी आता उत्तर दिलं आहे. आंदोलन करणार नसल्याच्या कोणत्याही बॉण्डवर सही केली नसल्याचं अभिजीत दिपके म्हणाले.

अभिजीत दिपके म्हणाले, “आम्ही आंदोलन करणार नाही अशा कोणत्याही बॉण्डवर स्वाक्षरी केलेली नाही. आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू”, असं अभिजीत दिपके म्हणाले.

तर, आता खऱ्या अर्थाने लढाई सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया सीजेपीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नरेंद्र मोदींनी नागरिकांमध्ये युद्ध सुरू केलं असून ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेत नाहीत तोवर मागे हटणार नसल्याची भूमिका सीजेपीने आज जाहीर केली.