नवी दिल्ली : जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची (सीजेपी) कार्यकर्ती निशू आझाद हिचे वडील संजय कुमार यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी स्वतंत्र भारद्वाज याला ताब्यात घेतले. भारद्वाज हा उजव्या विचारसरणीचा समाजमाध्यम प्रभावक (इन्फ्लुएन्सर) असून त्याच्या अटकेच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी ‘सीजेपी’ने संसद मार्ग पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यादरम्यान भारद्वाज उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर पळून गेला. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

संजय कुमार यांच्यावरीलहल्ला गंभीर असल्याने त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न तसेच, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘सीजेपी’ने केली. ती मान्य करण्यात आल्याचे, तसेच हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी संजय कुमार यांची नव्याने वैद्यकीय तपासणी करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्याचे ‘सीजेपी’च्या नेत्यांनी सांगितले. या प्रकरणी २३ जून रोजी गुन्हा दाखल झाला होता.

‘सीजेपी’चे सहसंयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता पटेल चौक येथून मोर्चा सुरू झाला. त्यात निशू आझाद, संजय कुमार, दिल्ली प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय लाक्रा, आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, पूर्णियाचे खासदार पप्पू यादव सहभागी झाले.

दबावानंतर भारद्वाजचे घुमजाव

नंतर, भारद्वाजने घुमजाव केले. पॉडकास्टमधील व्हायरल क्लिप बनावट असल्याचा दावा त्याने केला. मात्र, संजय कुमार यांच्यावर हल्ला केल्याचे त्याने नाकारले नाही. उलट, ‘स्वसंरक्षणासाठी कड्याने मारले’ अशी बचावात्मक भूमिका भारद्वाजने घेतली. एवढेच नव्हे, तर ‘पुन्हा अशाच प्रकारे मला घेरले आणि माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, तर मी पुन्हा कड्याने मारेन,’ असेही त्याने धमकावले.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संजय कुमार यांना किरकोळ दुखापत झाली होती. घटनास्थळावरून दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी झाली आणि नोटिसा बजावण्यात आल्या. यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळला.

पॉडकास्टमध्ये फुशारकी आणि राजकीय दावे

आंदोलनादरम्यान संजय कुमार यांच्या डोक्याला हातातील कड्यामुळे दुखापत झाली होती. या प्रकरणात स्वतंत्र भारद्वाज आणि सूरज कुमार या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांमध्ये पॉडकास्टमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. यूट्यूब पॉडकास्टमधील कथित क्लिपमध्ये भारद्वाजने संजय कुमार यांच्या डोक्यावर कड्याने मारल्याचा दावा केला. ‘डोक्याला ६० टाके पडले’, ‘संजय कुमार यांना रुग्णवाहिकेतून गंभीर अवस्थेत उपचारासाठी नेण्यात आले’ तसेच, ‘या प्रकरणात माझ्याविरोधात भादंसं-३०७ कलम (हत्येचा प्रयत्न) लागू होऊ शकते,’ अशी वक्तव्ये भारद्वाजने पोडकास्टमध्ये केल्याचे क्लिपमध्ये दिसते. विशेष म्हणजे, या प्रकरणात तुरुंगात गेलो नाही, राजकीय संपर्कामुळे आपल्यावर कारवाई झाली नाही, असा दावाही भारद्वाजने केला. दिल्लीतील मंत्री कपिल मिश्रा हे मोठ्या भावासारखे आहेत. तसेच, केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही आपली जवळीक असल्याचा दावाही त्याने केल्याचे क्लिपमध्ये दिसते.