दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनादरम्यान एका आंदोलकाच्या वडिलांचे डोके फोडल्याचा धक्कादायक दावा एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने केला आहे. “मी एका व्यक्तीचे डोके फोडले, तरीही मला तुरुंगात जावे लागले नाही; कारण माझ्यावर भाजप नेत्यांचा आणि पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद आहे,” असे वादग्रस्त वक्तव्य या कार्यकर्त्याने एका पॉडकास्ट मुलाखतीत केले आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असून विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या संदर्भातील वृत्त ‘द टेलिग्राफ ऑनलाईन’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

स्वतंत्र भारद्वाज असे या दाव्यांमुळे चर्चेत आलेल्या २१ वर्षीय कार्यकर्त्याचे नाव आहे. यूट्यूबवर प्रसारित झालेल्या एका तासाच्या मुलाखतीदरम्यान त्याने जंतर-मंतर येथील घटनेचा उल्लेख करत पोलिसांवर आणि राजकीय नेत्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे दावे केले.

पॉडकास्टमध्ये नक्की काय म्हणाला स्वतंत्र भारद्वाज?

मुलाखतीत बोलताना भारद्वाज म्हणाला, “मी निशूच्या वडिलांचे डोके फोडले होते. त्यांच्या डोक्याला तब्बल ६० टाके पडले होते. रुग्णवाहिकेत ते अक्षरशः मृत्यूशी झुंज देत होते. त्यांची मुलगी पोलिस ठाण्याबाहेर बसून न्यायाची मागणी करत होती; पण मी दुसऱ्याच दिवशी बाहेर होतो. मला तुरुंगातही जावे लागले नाही. मी रात्रभर बाहेर फिरत होतो.”

पुढे आपल्या राजकीय संबंधांबद्दल बोलताना तो म्हणाला, “माझ्यावर हनुमानजींचा आशीर्वाद आहेच, पण कपिल मिश्रा हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांच्या एका फोनमुळे माझी सुटका झाली असे लोक म्हणतात. चिराग पासवान आणि अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा माझे मोठे भाऊ आहेत. मला सर्वांचा पाठिंबा आहे.”

पोलिस उपकरणांबद्दल विचारले असता भारद्वाजने हसत उत्तर दिले, “माझे शूज दिल्ली पोलिसांचे आहेत, माझी लाठीही पोलिसांचीच आहे. मी कोणताही अर्ज भरत नाही, तरीही पोलिसांसारखाच फिरतो.”

दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण काय?

या संपूर्ण प्रकरणावर वाद निर्माण झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून २०२६ रोजी जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान बाचाबाची झाली होती. यामध्ये गाझियाबाद येथील रहिवासी संजय कुमार (वय ३८) यांच्या डोक्याला दुखापत झाली. ही दुखापत कोणत्याही हत्याराने झालेली नसून एका आरोपीच्या हातातील कड्यामुळे झाली होती, असा दावा पोलिसांनी केला आहे. आरएमएल (RML) हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही दुखापत साध्या स्वरूपाची असल्याचे म्हटले असून, खोपडी फुटल्याचा (Skull fracture) दावा पूर्णपणे तथ्यहीन असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

याप्रकरणी पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सूरज कुमार (२४) आणि स्वतंत्र भारद्वाज (२१) यांना नोटिसा बजावून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणतीही राजकीय मध्यस्थी किंवा दबाव नसून संपूर्ण कारवाई कायद्यानुसारच केली जात आहे; तसेच लवकरच न्यायालयात चार्जशीट दाखल केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

राहुल गांधी आक्रमक; अमित शहा आणि PM मोदींना सवाल

या घटनेचा व्हिडिओ आणि अहवाल समोर आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून केंद्र सरकारवर जोरदार निशाना साधला.

“निशू, घाबरण्याची गरज नाही. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू विद्यार्थी आणि तुझ्या समुदायाच्या हक्कासाठी आवाज उठवतेस, म्हणूनच तुला लक्ष्य केले जात आहे,” असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

राहुल गांधी यांनी पुढे लिहिले, “अमित शहा यांचे दिल्ली पोलिस एकीकडे विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करतात आणि दुसरीकडे एका दलित मुलीच्या वडिलांचे डोके फोडणारा आरोपी उघडपणे फिरत आहे. नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी, अशा गुन्हेगारांना तुमच्या पक्षाचे संरक्षण का आहे? आता तरी कारवाई होणार की आरोपींना वाचवण्याचे काम चालूच राहणार? ही लढाई एकट्याची नाही, न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही. जय भीम, जय संविधान!”

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके काय म्हणाले?

घटनेच्या दिवशी उपस्थित असलेले कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. “हल्ला झाला तेव्हा मी स्वतः डीसीपींकडे गेलो आणि गुंडांना अटक करण्याची मागणी केली. पण पोलिसांच्या समोरच हल्ला झाला असूनही ‘आम्ही कोणालाही असे थेट अटक करू शकत नाही, तुम्ही न्यायालयात जा’ असे उत्तर डीसीपींनी दिले,” असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला.

तसेच कॉक्रोच जनता पार्टी या आंदोलक संघटनेने भाष्य करताना म्हटले आहे की, “हा व्यक्ती स्वतः कॅमेऱ्यासमोर आंदोलकांवर हल्ला केल्याची आणि भाजप नेत्यांमुळे वाचल्याची कबुली देत आहे. कारवाई करण्यासाठी पोलिसांना अजून किती पुराव्यांची गरज आहे?”

या संपूर्ण प्रकरणामुळे सध्या दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पोलिस आता न्यायालयात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.