कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) विजेता दहिया या त्यांच्या प्रवक्त्याची हकालपट्टी केली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं देशातल्या तरुणांना न्याय देण्यासाठी आंदोलन सुरु आहे. जंतरमंतर या ठिकाणी हे आंदोलन सुरु असतानाच विजेता दहिया CJP च्या प्रवक्त्याचा बर्गर खात असतानाचा व्हिडीओ समोर आला. ज्यानंतर ही कारवाई CJP कडून करण्यात आली. आता या प्रकरणी विजेता दहिया या सीजेपीच्या माजी प्रवक्त्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी बर्गर खाल्लं त्यात गैर काय? असा सवाल विजेता दहियाने केला आहे.
विजेता दहियाच्या बर्गर व्हिडीओचं प्रकरण नेमकं काय?
जंतरमंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांवर सोमवारी लाठीचार्जही झाला. ज्याचा निषेध नोंदवला जातो आहे. दरम्यान विजेता दहिया या तरुणाचा जंतर मंतरच्या शेजारी असलेल्या मॉलजवळ बर्गर खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यानंतर काही आंदोलकांनी विजेता दहियाला आम्ही आंदोलन करतो आहोत आणि तू बर्गर खातो आहेस? असं विचारत विजेता दहियाला जाब विचारला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. यानंतर विजेता दहियाचं वर्तन बेजबाबदार असल्याचा ठपका ठेवत कॉक्रोच जनता पार्टीने त्याची प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी केली.
कॉक्रोच जनता पार्टीने नेमकं काय म्हटलंय?
“विजेता दहियाच्या असंवेदनशील कृतीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. पोलिसांकडून होणाऱ्या लाठीचार्जचा आंदोलक आणि टीममधील लोक सामना करत होते, त्यावेळीचा दहियाचा व्हिडीओ समोर आला आहे. हे त्याचे वर्तन अमान्य आहे. दहियाची कृती आमच्या चळवळीच्या मूल्यांशी व तत्त्वांशी पूर्णपणे विसंगत आहे”, असे कॉक्रोच जनता पार्टीने एक्सवरुन प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. कॉक्रोच जनता पार्टीने विजेता दहियाला पदावरुन हटवलं आहे. ज्यानंतर विजेता दहियाची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
व्हायरल व्हिडीओच्या वादावर काय म्हटलंय विजेता दहियाने?
मी एक बर्गर खाल्ला त्यात एवढा वाद होण्यासारखं काय आहे? आज त्याचा एवढा मोठा मुद्दा का तयार केला गेला? एखादा माणूस बर्गर का खातो? दोनच कारणं असतात एकतर त्याला भूक लागलेली असते किंवा दुसरी बाब म्हणजे त्याला बर्गर आवडत असतो. विषय संपला असं म्हणत विजेता दहियाने बर्गर खातच प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर पुढे विजेता म्हणतो तुम्ही काय मला निवडून दिलंय का? आंदोलक ही काय नोकरी आहे का?
मला या सगळ्यात पडायचं नाही. मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही. मला कुठलंही राजकारण करुन त्यात पडायचं नाही, कारण हा मूर्खपणा तुम्ही करत आहात. मी जे काही करतो आहे ते माझ्या देशासाठी करतो आहे. आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे तसाच माझाही अधिकार आहे. मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही मी यापुढेही बर्गर खाणारच. असं म्हणत विजेता दहियाने प्रतिक्रिया दिली आहे.
