Saurav Das PM Modi Dimagi Naxal Remark SRCC : कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख प्रवक्ते सौरव दास यांनी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) मधील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तरुणांना आणि प्रश्न विचारणाऱ्या पिढीला ‘दिमागी नक्षल’ म्हणून हिणवण्याऐवजी पंतप्रधानांनी शाळा बंद पडणे, नोकऱ्या आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर बोलायला हवं होतं, असं दास यांनी म्हटलं आहे. ‘दिमागी नक्षल’ हा शब्दप्रयोग गेल्या महिन्यात पंतप्रधानांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पहिल्यांदा केला होता.

या संदर्भात ‘X’वर टीका करताना सौरव दास म्हणाले, “भारतातील अग्रगण्य महाविद्यालयांमध्ये जाऊन तरुण आणि प्रश्न विचारणाऱ्या पिढीला पुन्हा एकदा दिमागी नक्षल म्हणून हिणवणं ही एका पंतप्रधानासाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. तेही शिक्षक दिनाच्या दिवशी. SRCC च्या स्वतःच्या शिक्षकांना वैद्यकीय आणि बालसंगोपन रजा नाकारल्याबद्दल आंदोलन का करावं लागलं, यावर ते बोलू शकले असते. त्यांनी SRCC च्या विद्यार्थ्यांना ढासळत असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचं आश्वासन दिलं असतं. विद्यार्थ्यांवर असणाऱ्या स्पर्धात्मकतेच्या प्रचंड दबावाची ते दखल घेऊ शकले असते.”

सौरव दास पुढे म्हणाले, “गेल्या एका दशकात जवळपास १ लाख शाळा बंद झाल्याबद्दल ते बोलू शकले असते. कोणतीही नोकरी, शिक्षण किंवा प्रशिक्षण न मिळता अडकलेल्या सुमारे ९ कोटी तरुण भारतीयांबद्दल ते बोलू शकले असते. उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच शाळा सोडणाऱ्या ७३ टक्के विद्यार्थ्यांबद्दल ते बोलू शकले असते. गेल्या १२ वर्षांत त्यांच्या स्वतःच्या सरकारने शिक्षणाचं बजेट अर्ध्याने कमी का केलं, याचे उत्तरही ते देऊ शकले असते! पण त्यांनी यापैकी कशाचीही निवड केली नाही. याउलट, पंतप्रधानांनी शिक्षक दिनाचा वापर तरुण पिढीला केवळ एका ‘गुन्ह्यासाठी’ दोष देणारे राजकीय भाषण देण्यासाठी केला; आणि तो गुन्हा म्हणजे सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारणे. पंतप्रधानांनी तरुणांना आशा दिली पाहिजे, अशी मूर्ख लेबले नाही. त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, प्रश्न विचारल्याबद्दल त्यांना बदनाम करू नये. ही अत्यंत दयनीय अवस्था आहे”, असं सांगत त्यांनी आपल्या विधानाचा समारोप केला.

पंतप्रधान मोदी SRCC मधील भाषणात ‘दिमागी नक्षल’ बद्दल काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींनी ‘दिमागी नक्षल’चं वर्णन करण्यासाठी होमिओपॅथीचे उदाहरण दिले होते. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे होमिओपॅथी औषध आजार बरे करण्यापूर्वी सुरुवातीला तो वाढवते, तसेच काहीसे ‘दिमागी नक्षल’च्या बाबतीत घडत आहे. पंतप्रधान म्हणाले, “तुम्ही माझे लाल किल्ल्यावरील भाषण ऐकले असेल. मी लाल किल्ल्यावरून “दिमागी नक्षल” नावाची होमिओपॅथीची गोळी दिली होती. होमिओपॅथीच्या सिद्धांतानुसार, जेव्हा तुम्ही होमिओपॅथी उपचार सुरू करता, तेव्हा आजार सुरुवातीला अधिक वाढतो. हा होमिओपॅथीचा स्वभाव आहे. त्याचप्रमाणे, मी दिमागी नक्षल ही होमिओपॅथीची गोळी देताच, सर्व दिमागी नक्षल एकामागून एक समोर येऊ लागले आहेत. आणि आता जनताही या आजाराचा प्रसार करणाऱ्यांचे खरे रंग पाहत आहे.”