जयपुरमधील एका शाळेच्या दुरावस्थेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर गेल्या महिन्यात हल्ला झाल्याची घटना समोर आली. जयपुरमधील रामपुरा कंवरपुरा गावातील सरकारी शाळेची जीर्ण झालेली ती इमारत अखेर बुधवारी पाडण्यात आली. राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, इथं आता १८ लाख रुपये खर्च करून नवीन इमारत बांधली जाणार आहे. २१ ऑगस्ट रोजी कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत या शाळेला भेट देण्यासाठी आले असता त्यांच्यावर हल्ला झाला होता.

गोठ्यात चालवली जात होती शाळा

सरकारने शाळेची इमारत नव्याने बांधण्याची घोषणा केल्यानंतर सीजेपीने त्यांच्या मोहिमेच विजय असल्याचे म्हटले आहे. सरकारी शाळांची दुरवस्था सुधारण्याचे उद्दिष्ट असलेल्या अभियानाचा हा विजय असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीने म्हटले आहे. २१ ऑगस्ट रोजी झालेल्या हल्ल्यात सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका जखमी झाले होते. ही शाळा म्हशींच्या गोठ्यात चालवली जात होती, असा आरोप सीजेपीकडून करण्यात आला होता.

आशुतोष रांका यांची पोस्ट

“शाळेची पाहणी करण्यासाठी गेलो असता आमच्यावर दगडफेक करण्यात आली, महिलांवर हल्ले झाले आणि गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. पण मुलांसाठी चांगली शाळा बांधली जाईल, तेव्हा या सर्व त्रासाचे चीज होईल,” असे रांका यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

स्थानिकांनी व्यक्त केले समाधान

सरकारकडून शाळेची इमारत नव्याने बांधली जात असल्याने स्थानिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. येथील स्थानिक नागरिक लालचंद शर्मा यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत, असुरक्षित इमारत पाडणे आणि नवीन इमारत बांधणे हा सकारात्मक बदल असल्याचे हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना म्हटले आहे. शाळेशी निगडीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना अयोग्य असल्याचे नमूद करताना शर्मा यांनी शाळा ज्ञानाचे मंदिर असून त्याचे राजकारण न करण्याचे आवाहन केले.

सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला

दरम्यान, सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी २१ ऑगस्ट रोजी शाळेला भेट दिली असता त्यांच्यावर काही जणांनी हल्ला केला होता. या घटनेमुळे राज्य सरकारवर टीका झाली होती. या घटनेनंतर दोनच दिवसांनी, म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी राजस्थान सरकारने नवीन शाळा इमारतीसाठी निधी जाहीर केला. सरकारी आदेशानुसार शाळा दुरुस्तीसाठी एकूण निधी १८ लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.