भारतीय राजकारणात आत्तापर्यंत काँग्रेस आणि भाजपा तसंच तशा प्रकारच्या मोठ्या पक्षांचाच वरचष्मा राहिला आहे. पैसा आणि ताकदीच्या बळावर चालणाऱ्या या राजकारणामुळे अनेक तरुण राजकारणापासून दूर जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांत सोशल मीडियाचे चित्र अचानक बदललं आहे. इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या ट्रेंडी रिल्स, मिम्स आणि राजकीय पोस्टचा महापूर आला आहे. या संपूर्ण वादळाच्या केंद्रस्थानी एक नवा पक्ष आहे, ज्याचे नाव ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) असे आहे. पुण्यातील एका ३० वर्षांच्या तरुणाने सुरू केलेल्या या डिजिटल पक्षाला मागील चार ते पाच दिवसांपासून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
कोण आहे या पक्षाचा संस्थापक?
- कॉक्रोच जनता पार्टी या डिजिटल मोहिमेमागे अभिजीत दिपके नावाच्या ३० वर्षीय डिजिटल स्ट्रॅटेजिस्टचा मेंदू आहे.
- अभिजीतने पुण्यामधून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्सचे उच्च शिक्षण घेत आहे.
- अभिजीत दीपकेने २०२० ते २०२३ दरम्यान अभिजीत आम आदमी पार्टीच्या (AAP) सोशल मीडिया टीमचा एक महत्त्वाचा भाग होता. २०२०च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला मिळालेल्या विजयात मिम्सच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्यात त्याचा मोठा वाटा होता.
- वैयक्तिक प्रगती आणि आर्थिक स्थैर्यासाठी त्याने ही नोकरी सोडली आणि तो अमेरिकेला गेला.
Cockroach Janta Party : पक्ष स्थापन करण्याचे मुख्य कारण काय?
काही दिवसांपूर्वी देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांची तुलना ‘कॉक्रोच’ म्हणजेच झुरळांशी केली होती. व्यावसायिक क्षेत्रात जागा मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या आणि बेरोजगारीचा सामना करणाऱ्या तरुणांविषयी त्यांनी हे विधान केले होते. नंतर सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण दिले की, त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला असून ते फक्त बनावट पदव्या घेऊन वकिलीत येणाऱ्या लोकांबद्दल बोलत होते. मात्र, देशाच्या संविधानाचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीकडून असा शब्द ऐकल्यामुळे अभिजीत खूप दुखावला गेला. “मी स्वतः एक झुरळ आहे आणि सरन्यायाधीश माझ्याबद्दलच बोलत होते,” असे मानून त्याने या संतापातून उपरोधिकपणे हा पक्ष स्थापन केला.
मागच्या चार दिवसांत काय घडलं?
Cockroach Janta Party ची सोशल मीडियावर इतकी मोठी क्रेझ निर्माण झाली की या पक्षाचे अवघ्या चार दिवसात भाजपेक्षा जास्त फॉलोअर्स ट्वीटरवर झाले होते.
कॉक्रोच जनता पार्टीने सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला चार दिवसात फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगी होती. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी हा पक्ष सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
कॉक्रोच जनता पार्टी या पक्षाचं अधिकृत ट्वीटर हँडल हे तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आलं आहे.
कॉक्रोच जनता पार्टीने पोस्ट केलेल्या व्यंगचित्रात काय उल्लेख?
कॉक्रोच जनता पार्टीने एक व्यंगचित्र पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये एक झुरळ कमळ खाताना दिसतं आहे. फक्त चार दिवसांत आम्ही हेडिजिटल मीडियावर करुन दाखवलं, तुम्हाला तरुणांची ताकद कळणार नाही या आशयाचा मजकूर लिहून हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आलं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात काय काय म्हटलंय?
१) निवृत्तीनंतर कोणत्याही सरन्यायाधीशांना राज्यसभेची जागा बक्षीस म्हणून दिली जाणार नाही.
२) निवडणूक आयोगाने कोणत्याही मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने वगळल्यास त्यांच्यावर थेट कडक कारवाई केली जाईल.
३) महिलांना राजकारणात आणि नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण दिले जाईल.
४) मोठ्या उद्योगपतींच्या मालकीच्या मीडिया हाऊसेसचे परवाने रद्द केले जातील.
५) पक्षांतर करणाऱ्या कोणत्याही आमदार किंवा खासदाराला पुढील २० वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाईल.
अभिजीत दीपके काय म्हणाले?
‘कॉक्रोच जनता पार्टी’चं एका चळवळीत रुपांतर होताना दिसत आहे. मात्र, कॉक्रोच जनता पार्टीचं राजकीय पक्षात रुपांतर होणार का? असा प्रश्न अभिजीत दीपके यांना विचारला. यावर बोलताना अभिजीत दीपके यांनी म्हटलं की, “नक्कीच होईल. पण आत्ता त्याबाबत ठामपणे सांगणं थोडं अवघड आहे. कारण सर्वांनाच माहिती आहे की ही कॉक्रोच जनता पार्टी आम्ही कोणतंही नियोजन करून सुरू केलेली नव्हती. जर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ते वक्तव्य केलं नसतं, तर आज कदाचित हे घडलंही नसतं”, असं अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे.
चार दिवसांत आम्हाला १ कोटींहून अधिक लोकांनी फॉलो केलं-दीपके
“आम्ही असा कोणताही प्लॅन करून काही केलं नव्हतं. पण अवघ्या ३ ते ४ दिवसांत १ कोटी १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी आम्हाला फॉलो केलं आहे. त्यामुळे एवढ्या लोकांशी बोलून पुढील नियोजन करणं खूप अवघड आहे. तरीही आम्ही या लोकांशी बोलणार आहोत, लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत, लोकांची मतं काय आहेत? हे जाणून घेऊ. लोकांचा सध्याच्या व्यवस्थेवर आणि सरकारवर एवढा राग का आहे? यांची कारणं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जोपर्यंत लोकांच्या भावना आम्ही जाणून घेत नाहीत, तोपर्यंत पुढील काही नियोजन आम्हाला करता येणार नाही”, असं अभिजीत दीपके यांनी सांगितलं आहे.
