पीटीआय, श्रीनगर : दहशतवादाला निधीपुरवठा केल्याच्या प्रकरणात जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष यासीन मलिक याला दिल्या जाणाऱ्या शिक्षेबाबत न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच श्रीनगरच्या काही भागांत बुधवारी उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. यासिन मलिक राहात असलेल्या मैसुमा वस्तीत त्याचे समर्थक आणि सुरक्षा दले यांच्यात चकमकी झडल्या.

महिलांसह अनेक लोक शहरातील लाल चौक सिटी सेंटरपासून जवळच असलेल्या मैसुमातील मलिक याच्या निवासस्थानी गोळा झाले व त्यांनी या फुटीरतावादी नेत्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यांनी या भागात निषेध मोर्चाही काढला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. निदर्शकांनी मैसुमा चौकाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात त्यांची सुरक्षा दलांशी चकमक झाली. त्यांच्यापैकी काहींनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली असता, जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या. तथापि, कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

मैसुमा व लाल चौकासह आसपासाच्या भागांतील बहुतांश दुकाने व औद्योगिक प्रतिष्ठान बंद होते. जुन्या शहरातील काही दुकानेही बंद ठेवण्यात आली, मात्र सार्वजनिक वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होती. कायदा व सुव्यवस्थेची समस्या उद्भवू नये यासाठी शहरात मोठय़ा संख्येत सुरक्षा दले तैनात करण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणात मलिक याच्याविरुद्ध लावण्यात आलेले सर्व आरोप त्याने मान्य केल्यानंतर, दिल्लीतील एका न्यायालयाने त्याला कठोर अशा दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली १९ मे रोजी दोषी ठरवले होते. शिक्षेचे प्रमाण ठरवण्यासाठी विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी २५ मे ही तारीख निश्चित केली होती.

शिक्षा ‘दुर्दैवी’- पीएडीजीची प्रतिक्रिया

दहशतवादाला निधीपुरवठय़ाच्या एका प्रकरणात दिल्लीतील एनआयए न्यायालयाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचे वर्णन ‘दुर्दैवी’ असे करतानाच, हा शांततेच्या प्रयत्नांना ‘धक्का’ असल्याची प्रतिक्रिया पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन (पीएजीडीने) बुधवारी व्यक्त केली. न्यायालयाच्या निकालामुळे परकेपणा व फुटीरतावादी भावनांमध्ये भरच पडेल, असे पीएजीडीचे प्रवक्ते एम.वाय. तारिगामी यांनी येथे जारी केलेल्या निवेदनात सांगितले. ‘यासिन मलिकला सुनावण्यात आलेली जन्मठेप दुर्दैवी असून हा शांततेच्या प्रयत्नांना धक्का आहे. यामुळे या भागात अनिश्चितता आणखी वाढीला लागेल’ आणि फुटीरतावादी भावनांनाही बळ मिळेल’, असे तारिगामी म्हणाले. एनआयए न्यायालयाने निकाल दिला, मात्र न्याय दिला नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. मलिक याने या निकालाच्या विरोधात आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर संधींचा वापर करावा, अशीही सूचना पीएजीडीने केली.