Cleanfluencers India Civic Sense Trend: सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर ही संज्ञा आता भारतात बऱ्यापैकी रुजली आहे. शहर आणि ग्रामीण भागातही इन्फ्लुएन्सर्सची संख्या वाढलेली दिसते. करमणूक करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सची संख्या अधिक असली तरी काही जण वाचन, तंत्रज्ञान, शिक्षण, अर्थ, आरोग्य, लाइफस्टाइल असा विविध क्षेत्राशी संबंधित माहिती देणारे इन्फ्लुएन्सर्स झालेले आहेत. यात आता ‘क्लीनफ्लुएन्सर्स’ची भर पडताना दिसत आहे. क्लीनिंगचे म्हणजेच स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे इन्फ्लुएन्सर्स असल्यामुळे त्यांना ‘क्लीनफ्लुएन्सर्स’ असे म्हटले जात आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकवर हल्ली अनेक ‘क्लीनफ्लुएन्सर्स’चे व्हिडीओ दिसतात. लोक त्याला लाइकही करतात. मात्र प्रत्यक्षात ‘क्लीनफ्लुएन्सर्स’चे काम किती आव्हानात्मक आहे, त्यांना स्वच्छता करताना कोणत्या अडचणी येतात? आणि एकूणच भारतीयांच्या स्वच्छतेबाबतच्या अनास्थेला ते बदलू शकतात का? यावर चर्चा होत आहे. यानिमित्ताने काही ‘क्लीनफ्लुएन्सर्स’चा घेतलेला हा आढावा.
“ते माझ्यावर हसतात. मला वेडा म्हणतात. काही जण मला त्यांचे गटार स्वच्छ करण्यासाठी बोलवतात. तर काही जण मला ‘नालेसफाई करणारा’, असे संबोधतात”, ही खंत व्यक्त केली आहे बिट्टू नामक ‘क्लीनफ्लुएन्सर्स’ने. मध्य प्रदेशमधील बिओरा या छोट्याश्या शहरात तो राहतो. २० वर्षांच्या या मुलाने काही दिवसांपूर्वी अत्यंत प्रदूषित असलेल्या अजनर नदीत स्वतः उतरून हातांनी कचरा बाहेर काढला होता. या नदीचा आधीचा अस्वच्छ आणि नंतर स्वच्छ केलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
मात्र बिट्टूचे काम वाटते तेवढे सोपे नाही. तो म्हणतो, मी जेव्हा जेव्हा बाहेर एखादा अस्वच्छ परिसर स्वच्छ करण्यासाठी जातो, तेव्हा मला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. मी जेव्हा नदीच्या ठिकाणी स्वच्छता करायला लागतो, तेव्हा लोक मुद्दामहून कचरा फेकतात. जर मी त्यांना अडवले, तर ते भांडायला उठतात.
भारतासारख्या देशात जिथे स्वच्छतेचे महत्त्व विविध पवित्र ग्रंथात नमूद केलेले आहे. अनेक संत, महापुरूषांनी स्वच्छतेचा आग्रह धरला होता आणि समाजाला त्यासाठी प्रेरित केले होते. मात्र आजही उच्चभ्रू परिसरापासून ते झोपडपट्ट्यांबाहेर कमालीची अस्वच्छता दिसून येते. सामान्य लोक यासाठी केवळ सरकारकडे बोट दाखवत असताना हे फक्त कागदावरच दिसते, तिथे ‘क्लीनफ्लुएन्सर्स’नी मात्र स्वतः यासाठी पुढाकार घेतला आहे. हे लोक नदी, घाट, रस्ते आणि उद्याने स्वच्छ करतात. आधीचा अस्वच्छ परिसर, प्रत्यक्ष स्वच्छता आणि त्यानंतरचे सुंदर चित्र या पूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाते. मात्र ‘क्लीनफ्लुएन्सर्स’चे काम समाजाला संकोच निर्माण करणारे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
कोणत्याही उपकरणांशिवाय हातांनी केली स्वच्छता
बिट्टूने २६ जानेवारी रोजी प्रण केला की, सरकार किंवा यंत्रणांना दोष न देता मी स्वतः नदी स्वच्छ करणार. “नदी स्वच्छ करण्यासाठी मला मशीन आणायची होती. पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. मी विद्यार्थी आहे. त्यामुळे मी हातानीच जमेल तितकी स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला. रोज नदीवर येऊन काम करत असताना मी जवळपास ५०० मीटरचा परिसर कोणत्याही सुरक्षेच्या उपकरणांशिवाय स्वच्छ केला. याचा फटकाही मला बसला. जंतुसंसर्ग झाल्यामुळे माझ्या हातापायाच्या त्वचेला इजा पोहोचली”, अशी माहिती बिट्टूने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.
एवढे करूनही बिट्टूला स्थानिकांचा पाठिंबा मिळालेला नाही. बिट्टू म्हणतो, लोकांनी कौतुक करणे तर सोडाच पण कचरा टाकणेही थांबवले नाही. नदीत कचरा टाकला जाऊ नये, यासाठी मी तिथे कचऱ्याचे डबे ठेवले. पण तरीही लोक त्याचा वापर करत नाहीत. मी जेव्हा त्यांना अडवतो, तेव्हा तेच माझ्यावर खेकसतात. नदी तुझी आहे का? तू हे का (स्वच्छता) करतोयस? असे उलट प्रश्न विचारतात.
आनंद महिंद्राकडून कौतुक
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी बिट्टूचा एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या कामाचे कौतुक केले होते. या व्हिडीओत तो नदीतून चिखल, प्लास्टिक, वनस्पती आणि डेब्रिस काढताना दिसून आला. या व्हायरल व्हिडीओनंतर बिट्टूचे सर्वत्र कौतुक झाले. पण कौतुकाबरोबरच आता त्याला टीकेचाही सामना करावा लागत आहे. कारण तो हे सर्व लाइक्स आणि व्ह्यूजसाठी करत असल्याचा आरोप लोक करत आहेत.
भारतासारख्या देशात सार्वजनिक स्वच्छतेचे नियम जिथे सर्रास आणि राजरोसपणे पायदळी तुडवले जातात, तिथे बिट्टू करत असलेल्या कामावर अनेकजण नाके मुरडणे साहजिक आहे. भारतात सोशल मीडियावर लोकांनी कचऱ्या फेकण्याचा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. झिरो सिव्हिक सेन्स या कीवर्डने असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दिसत असतात. जेव्हा काही जण ही समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करतात, तेव्हा मात्र त्यांना उपेक्षेचा सामना करावा लागतो.
पर्यावरण विषयक कंटेट क्रिएटर सोनाली सिंह
दिल्लीस्थित पर्यावरणविषयक कंटेट क्रिएटर सोनाली सिंह यांनाही याप्रकराच्या विरोधाभासाला तोंड द्यावे लागले आहे. सोनाली म्हणते, स्वच्छता मोहिमेचे चित्रीकरण करणे आमच्यासाठी प्रेरणेपेक्षा डोकेदुखीच अधिक ठरते. “मी जेव्हा यमुनेच्या तिरावर लोकांना विसर्जन करताना, मुर्त्या तिथेच सोडून जाताना पाहते, तेव्हा मला वाईट वाटते. लोक जराही विचार करत नाहीत. जर एकाने कचरा केला तर त्याच्यामागून दहा लोक हीच कृती पुन्हा करतात”, अशी खंत सोनालीने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना व्यक्त केली.
सोनाली सांगण्याचा प्रयत्न करते की, तुम्ही करत असलेले कृत्य धर्माचा आदर करत नाही, पण बिट्टूप्रमाणेच तिलाही विरोधाचा सामना करावा लागतो. पर्यावरणवादी विचारांना अनेकदा लोक धर्माविरोधातील मते समजून टीका करतात. सोनाली म्हणते, लोक मला विरोधक समजतात. मला बोल लावतात. पण जर इंटरनेटवर राहून काम करायचे असेल तर या सर्वांचा सामना करावा लागेल.
क्लीनफ्लुएन्सर्सच्या हेतूवर शंका
क्लीनफ्लुएन्सर्सवर होणारी टीका फक्त सांस्कृतिक नसून ती मानसिकही आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ. रिम्पा दास यांच्या मते अशाप्रकारच्या कंटेटला संमिश्र असा भावनिक प्रतिसाद मिळतो. हे व्हिडीओ पाहताना अनेकजण त्याला सकारात्मक प्रतिसाद देतात. पण ते स्वतः कचरा टाकत असताना त्यांचा जर क्लीनफ्लुएन्सरशी सामना झाला तर ते अस्वस्थ होतात. त्यांना स्वत:ची चूक लपवायची असते, त्यामुळे ते स्वच्छता करणाऱ्यांच्या हेतूवरच संशय घेतात.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाच्या उपस्थितीवरून प्रत्येक गोष्टीची पारख होत असते. त्यात जर कॅमेऱ्यात एखादी गोष्ट कैद केली जात असेल तर त्याच्या हेतूबद्दल पहिला प्रश्न विचारला जातो. कंटेट क्रिएटर हे खरंच एखाद्या गोष्टीसाठी समर्पित आहेत की, ते फक्त व्ह्यूज आणि लाइक्ससाठी हे करत आहेत, असा प्रश्न लोकांच्या मनात येतो.
बिंग लॅब्सचे सहसंस्थापक आर्यन अनुराग यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले की, क्लीनफ्लुएन्सर्सचा हेतू काहीही असो पण या व्हिडीओचा फॉरमॅट नक्कीच सकारात्मक आहे. बिफोर अँड आफ्टर (आधी आणि नंतर) व्हिडीओमध्ये बदल स्पष्टपणे दिसून येतो. एखाद्या समस्येपासून त्याच्या निराकरणापर्यंतचा प्रवास दिसत असतो. त्यामुळेच अशाप्रकारचा कंटेट पाहायला आणि तो पचवायला सोपा असतो. तसेच तो मोठ्या प्रमाणात शेअरही होतो.
भारतात सध्या क्लीनफ्लुएन्सर्सची संख्या किंवा त्यांचा कंटेट वाढत आहे. लोक ऑनलाइन काय करतात, काय बोलतात यापेक्षा ते ऑफलाइन कसे आहेत, यातला फरक क्लीनफ्लुएन्सर्सच्या व्हिडीओमधून दिसतो. या माध्यमातून सिव्हिक सेन्सची चर्चाही झडत आहे, पण त्याची अंमलबजावणी मात्र तुरळकच आहे.
