पंजाबमधील घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप होत आहे. समारोप सोहळ्यात प्रथेप्रमाणे यंदाही काही महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही प्रमुख मागणी करण्यात आली. त्याचबरोबर दुरदर्शनवरून साहित्य संमेलनाचे उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्याची मागणीही आयोजकांनी सरकारकडे केली. घुमान साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेवटच्या दिवशी ज्ञानपीठ पुरस्कारविजेते भालचंद्र नेमाडे यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी एकमुखाने करण्यात आली. तसेच आगामी काळात पंढरपूर ते घुमान नामदेव एक्सप्रेस सुरू करावी आणि घुमान गावाचे ‘बाबा नामदेव घुमान नगरी’ असे नामकरण करावेत, असे ठरावही समारोपाच्या कार्यक्रमात मंजूर करण्यात आले.
समारोप सोहळ्याच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष अतिथी म्हणून तर पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबिरसिंह बादल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. तर, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हेदेखील याठिकाणी उपस्थित आहेत.