जम्मू काश्मीरमध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. त्यात अमरनाथ गुंफेजवळ ढगफुटीची घटना घडली आहे. त्यामुळे सिंधु नदीची पातळी वाढली आहे. ढगफुटीची माहिती मिळताच एसडीआरएफची एक टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. तर दोन टीम यापूर्वीच तिथे तैनात आहेत. सध्या या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बीएसएफ आणि सीआरपीएफ कँपचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्यावेळी दुर्घटना झाली, तेव्हा सुदैवाने कोणीही गुंफेत नव्हतं.

अमरनाथ यात्रा यंदा २८ जूनपासून सुरु होऊन २२ ऑगस्टपर्यंत होणार होती. मात्र करोनामुळे यात्रा स्थगित करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “या दुर्घटनेत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. गुंफेजवळ एसडीआरएफच्या दोन टीम तैनात आहेत. एक अतिरिक्त टीम गांदरबल येथे पाठवली आहे. यावर्षी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आल्याने गुंफेत कुणीही नव्हतं. फक्त श्राइन बोर्डाचे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक आहेत”, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

या दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत उपाययोजनांबाबत माहिती दिली. “बाबा अमरनाथ गुंफेजवळ ढगफुटी झाल्याची माहिती मी जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडून घेतली आहे. एनडीआरएफची टीम तिथे पाठवली आहे”, असं ट्वीट अमित शाह यांनी केलं आहे.

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील होंजोर दच्छन भागात ढगफुटी झाल्याने काही जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७ जणांचे शव बाहेर काढण्यात आले आहेत. तर १७ जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. मात्र पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा वेगाने काम केलं जात आहे.