आप या पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मागच्या महिन्यात अटक करण्यात आली आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने मागच्या महिन्यात ही कारवाई केली. अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगात आहेत. या दरम्यान दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू कोर्टात अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान ईडीने त्यांच्यावर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे न्यायालयाकडून जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल यांच्याकडून खटाटोप केला जातो आहे असंही ईडीने म्हटलं आहे.

काय आरोप केला आहे ईडीने?

अरविंद केजरीवाल तुरुंगात मिठाई, आंबे, साखर, बटाटे खात आहेत. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. तरीही त्यांची शुगर वाढावी म्हणून अरविंद केजरीवाल प्रयत्न करत आहेत. त्याद्वारे जामीन मिळवण्याचा प्रयत्न केजरीवाल करत आहेत असा आरोप ईडीने केला आहे. ईडीच्या आरोपानंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांचा डाएट चार्ट मागवला आहे.

अरविंद केजरीवाल यांना टाइप टू प्रकारचा मधुमेह

अरविंद केजरीवाल यांना टाइप २ प्रकारचा मधुमेह आहे. अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक बटाटे, मिठाई, आंबे खात आहेत. जाणीवपूर्वक गोड पदार्थांचं सेवन करत आहेत. या सेवनामुळे त्यांची शुगर लेव्हल वाढेल आणि त्यांना जामीन मिळण्यास मदत होईल असा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. तुरुंग प्रशासनाने आम्हाला अरविंद केजरीवाल यांचा डाएट प्लान दिला आहे. त्यामध्ये केजरीवा काय काय खातात याची माहिती आहे. आंबे, बटाटे, मिठाई हे गरजेपेक्षा जास्त खात आहेत हे सगळं ते मुद्दाम करत आहेत असाही आरोप ईडीने केला आहे. आता या प्रकरणी पुढच्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

Loksabha Election 2024 : आप स्टार प्रचारक यादी; अरविंद केजरीवालांच्या अनुपस्थितीत ‘हे’ दिग्गज आपचा किल्ला लढवणार!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा संदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पत्नीमार्फत आपच्या कार्यकर्त्यांसाठी खास संदेश पाठवला आहे. ”तुम्हा सर्वांना मी नमस्कार करतो. मी आज तुम्हाला मलाच वोट करा असं सांगत नाही. आगामी निवडणुकीत तुम्हाला कोणाला पराभूत करण्यासाठी किंवा विजयी करण्यासाठी आवाहनही करत नाही. मी १४० कोटी देशवासीयांना भारतासाठी सहयोग देण्याची आवाहन करत आहे. नवा भारत बनवण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करत आहे. भारत महान देश आहे. आपली संस्कृती फार काळ पूर्वीची आहे. तरीही आपल्या देशात लोक अशिक्षित का आहेत? गरिब का आहेत? असा सवाल केजरीवाल यांनी तुरुंगातून पाठवलेल्या संदेशातून केला आहे.