महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा सांगितला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई हे बेळगावला जाणार होते. तिथे जाऊन दोन्ही मंत्री महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी जाऊन चर्चा करणार होते. पण, त्यापूर्वी आता मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंत्री पाटील आणि देसाई हे ६ डिसेंबरला बेळगावला जाणार होते. पण, आज ( ५ डिसेंबर ) बसवराज बोम्मई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावरून नाराजी व्यक्त केली. तसेच, बेळगावात आल्यास कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत बोम्मईंनी दिले.

बोम्मई म्हणाले, “कर्नाटकच्या मुख्यमंत्री सचिवांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहूनही मंत्र्यांनी बेळगावला भेट देणे योग्य नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार, असल्याचं सांगितलं आहे. त्यांना देशात मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. पण, ही योग्य वेळ नाही. महसूल आणि पोलीस प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत,” अशी माहिती बोम्मई यांनी दिली.

दरम्यान, बेळगावचा दौरा मंत्री पाटील आणि मंत्री देसाईंनी रद्द केल्याची चर्चा होती. त्यावर शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की, “६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेळगावात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी आम्ही आमचा ६ तारखेचा दौरा निश्चित केलेला आहे. आम्ही येणार आहोत असं कर्नाटक सरकारला अधिकृतरित्या कळवलं होतं. परंतु, दौऱ्याबाबत विस्तृत माहिती दिलेली नाही. सध्या तरी हा दौरा अधिकृतरित्या रद्द केल्याचं कळवलं नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांशी चर्चा करून आम्ही दोघेही त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेणार आहोत.” असं शंभूराज देसाईंनी म्हटलेलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm basavaraj bommai warn maharashtra minister insist on visiting belagavi ssa
First published on: 05-12-2022 at 18:05 IST