उत्तराखंडमध्ये अडकलेला महाराष्ट्रातील शेवटचा भाविक घरी सुखरूप पोहोचेपर्यंत शासनाची मदत सुरू राहील, असा दिलासा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तराखंडमधून दिल्लीत दाखल झालेल्या मराठी भाविकांशी संवाद साधताना दिला. महाराष्ट्रातील भाविकांच्या मदतीसाठी त्यांनी आणखी ५० लाख रुपयांची मदत तसेच दोन हेलिकॉप्टर पाठविण्याची घोषणा केली.महाराष्ट्रातील भाविकांसाठी डॉक्टरांचे पथक, दोन प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांसह ३० अधिकारी उत्तराखंडला पाठविण्यात आले आहेत. ही यंत्रणा भारत सरकार आणि उत्तराखंड सरकारच्या अधीन राहूनच काम करेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील भाविकांच्या मदतीसाठी २५ कोटी रुपयांचा मदतनिधी उभा राहिला असल्याची माहिती त्यांनी दिली. बचावकार्यात खंड पडू नये म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे उत्तराखंड सरकारला १० कोटी रुपये देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत पोहोचलेल्या भाविकांसाठी महाराष्ट्र सदन येथे सर्व तऱ्हेची मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.