नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आव्हानाच्या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या पुढे मानवाला वाटचाल करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढचे एखादे संमेलन यंत्रमानवांचेही घ्यावे लागू शकते. तथापि तंत्रज्ञानापेक्षा माणूस कायम अग्रेसर राहणे आवश्यक आहे. साहित्य व्यक्तिमत्त्वाला यंत्रमानव होऊ देत नाही, मनाची तरलता जिवंत ठेवण्यासाठी साहित्याची निर्मिती करत रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी शनिवारी केले.
महिला प्रशासकीय अधिकार्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. फायलींमध्ये हरवून जाणार्या प्रशासकीय महिला अधिकार्यांच्या या साहित्य संमेलनांनानी भावविश्वाला सांभाळण्याचे काम या साहित्य संमेलनातून झाले आहे. ‘निर्णयार्थ सादर’ अशा प्रशायकीय शेर्यापेक्षा कविता आणि कादंबर्यामधून प्रगत होणारी ही भाषा संवेदनशील आणि तरल आहे. त्यामुळे खरोखर आनंद होत आहे.
यावेळी त्यांनी महिलांच्या मल्टीटास्किंग कौशल्याचे कौतुक करताना महिला अधिकारी दिलेल्या जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडतात असे सांगितले. महायुतीच्या कार्यकाळातच राज्याला महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. मुख्य सचिवांपासून तर, मुंबई महानगरपालिका आयुक्तांपर्यंत अनेक महत्त्वाच्या पदांवर महिलांची वर्णी लागल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र सदनातील या संमेलन स्थळाला छत्रपती महाराणी ताराराणी दालन नाव देण्यात आले आहे. ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंतीनिमित्ताने या संमेलनाचे आयोजन करणयात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखिका माजी अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेहंदळे, माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सहमहालेखा नियंत्रक सुप्रिया देवस्थळी, महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला आदी उपस्थित होते.
भारतातल्या कोणत्याही भाषेमध्ये होणार्या साहित्य संमेलनापेक्षा मराठीत होणारी संमेलने सर्वाधिक आहेत. झाडीपट्टीपासून ते विद्रोही साहित्य संमेलनापर्यंत हा साहित्यिकांचा मेळा सर्वाधिक मराठीत फुलतो, असे फडणवीस म्हणाले.
‘पवारांचा वारकरी संप्रदायाशी संबंध राहिलेला नाही ’
राज्याच्या विकासात शरद पवारांचे मोठे योगदान असले तरी त्यांचा वारकरी संप्रदायाशी काहीही संबंध राहिलेला नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. महिला प्रशासकीय अधिकार्यांच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी फडणवीस यांनी संवाद साधला. या संमेलनाच्या सौदामिना या स्मरणिकेमधील लेखामध्ये शरद पवार यांनी वारकरी संप्रदायावर टिप्पणी केली आहे. त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
