CM Joseph Vijay Slams Udayanidhi Stalin: तमिळनाडू विधानसभेचे विरोधीपक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर बराच वाद झाला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही स्टॅलिन यांच्यावर टीका झाली. याप्रकरणी आता मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे. तमिळनाडू विधानसभेत बोलताना विजय यांनी स्टॅलिन यांचे नाव न घेता घडल्या प्रकाराबाबत मत व्यक्त केले.

मुख्यमंत्री विजय काय म्हणाले?

“अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर कसा केला जात आहे, हे आपण तपासून पाहायला पाहिजे. तसेच, आपल्या लोकांबद्दल किंवा महिलांबद्दल अपमानजनक पद्धतीने बोलणे खपवून घेतले जाऊ नये,” असे मुख्यमंत्री विजय उदयनिधी स्टॅलिन यांचे नाव न घेता विधानसभेत म्हणाले. “लोक पाहतायेत काहीजण डबल मीनिंग बोलतायेत. मला एवढंच सांगायचं आहे की सर्वांच्या घरात महिला बहीण, आईच्या रुपाने आहेत. महिलांचा अनादर होत असेल तर कायदा योग्य ती कारवाई करेल”, असेही विजय पुढे म्हणाले.

उदयनिधी यांच्या वादग्रस्त विधानाचा संदर्भ

काही दिवसांपूर्वी उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री आणि मुख्यमंत्री विजय यांच्या मैत्रीण त्रिशा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानाचे राजकीय, सामाजिक स्तरात तीव्र पडसाद उमटले होते. या वक्तव्यानंतर उदयनिधी यांना अटक आणि त्यानंतर सुटका देखील करण्यात आली होती. ०३ ऑगस्ट रोजी कावेरीच्या पाण्यावरुन तंजावरमध्ये आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या मोर्चाला संबोधित करताना उदयनिधी स्टॅलिन यांनी त्रिशा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. उपस्थित जमाव देखील यावेळी त्रिशा – त्रिशा नावाने घोषणा देत होते. दरम्यान, उदयनिधी यांनी त्यांचे वक्तव्य कावेरीशी निगडीत असल्याचे सांगितले.

उदयनिधी यांची अटक आणि सुटका

दरम्यान, या वक्तव्यानंतर ०४ ऑगस्ट रोजी चेन्नई निवासस्थानावरुन अटक केली. यानंतर त्यांची त्याच दिवशी जामिनावर सुटका देखील करण्यात आली. उदयनिधी यांनी मात्र विजय यांच्या सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला तसेच, महिलांचा अपमान करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता असे स्पष्टीकरण दिले.

कायदा आणि सुव्यवस्थेवर मुख्यमंत्र्यांचे भाष्य

मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत बोलताना, “कायदा आणि सुव्यवस्था राखणे एवढेच विकासासाठी आवश्यक नाही किंवा संशयितांना अटक करणे एवढ्या पुरते मर्यादीत नाही तर, पोलिस राज्याच्या विकासाचा पाया आहेत. एक गुन्हा कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे हे सांगण्यासाठी पुरेसा नाही. नागरिकांचा कायद्याचे भय उरले नाही, हे देखील गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत आहे.” याशिवाय वाढते सायबर गुन्हे देखील मोठे आव्हान असल्याचे मुख्यमंत्री विजय यांनी नमूद केले.