scorecardresearch

जळितकांडामागे कारस्थान- ममता

रामपुरहाटच्या घटनेमागे कारस्थान असल्याचे मला अजूनही वाटते. तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय चांगला होता.

बागडोगरा: पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या हत्येनंतर झालेल्या महिला व मुलांसह आठ जणांच्या जळितकांडामागे ‘कारस्थान’ असल्याचे राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी सांगितले. या प्रकरणाचा तपास करताना सीबीआयने ‘भाजपच्या आज्ञा पाळल्यास’ तृणमूल कांग्रेस त्याला विरोध करेल, असेही त्या म्हणाल्या.

 ‘रामपुरहाटच्या घटनेमागे कारस्थान असल्याचे मला अजूनही वाटते. तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय चांगला होता. मात्र त्यांनी केवळ भाजपच्या आज्ञा पाळल्यास आम्ही विरोध करण्यास तयार आहोत’, असे उत्तर बंगालमधील बागडोगरा येथे एका कार्यक्रमात बोलताना ममता म्हणाल्या.

 ‘टागोर यांचा नोबेल पुरस्कार, नेताजींचा मृत्यू आणी तापसी मलिक प्रकरण यांच्या तपासासह भूतकाळातील घटनामध्ये आम्ही असे पाहिले आहे, की न्याय देण्यात सीबीआय अपयशी ठरले. किंबहुना, विशेष तपास पथकाने अधिक चांगला तपास केला’, असेही बॅनर्जी यांनी सांगितले. या घटनेत तृणमूलच्या एका कार्यकर्त्यांची पक्षाच्याच दुसऱ्या कार्यकर्त्यांने हत्या केली, पण केवळ तृणमूलवरच सर्वत्र टीका केली जात आहे, याचा त्यांनी उल्लेख केला.  बीरभूममधील बोगतुई खेडय़ात झालेल्या हत्याकांडाचा तपास करण्याचा आदेश कलकत्ता उच्च न्ययालयाने शुक्रवारी सीबीआयला दिला होता. या आठवडय़ाच्या सुरुवातीला झालेल्या घटनेत ८ जणांना जिवंत जाळून मारण्यात आले होते. या प्रकरणी ७ एप्रिलला पुढील सुनावणी होणार असून, त्यापूर्वी तपासाचा प्राथमिक अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सीबीआयला सागितले आहे. तपासात सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm mamata banerjee alleges conspiracy by outsiders zws