बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका बुरखाधारी मुलीच्या चेहऱ्यावरील बुरखा ते स्वत:च्या हाताने खाली सरकवत असल्याचं दिसून येतं. पाटणा येथे आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्राचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत होते. याच कार्यक्रमातील नितीश कुमार यांच्या व्हिडिओवरुन वाद राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजदने नितीश कुमारांवर जोरदार टीका केली आहे. नितीश कुमार १०० टक्के संघी झाले आहेत अशी टीका राजदने केली आहे.
राजदने पोस्ट केला व्हिडीओ आणि नितीश कुमारांवर टीका
लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाने म्हणजेच आरजेडीने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये, हिजाब परिधान केलेल्या एका महिलेच्या चेहऱ्यावरील हिजाब बाजूला काढताना मुख्यमंत्री नितीश कुमार दिसून येतात. नितीश कुमारांना हे काय झालंय? त्यांची मानसिक स्थिती आता अतिशय दयनीय झाली आहे, किंवा नितीश बाबू १०० टक्के संघी बनले आहेत, अशी बोचरी टीका राजद पक्षाने केली आहे. तर, काँग्रेसनेही या व्हायरल व्हिडिओवरुन संताप व्यक्त करत, हे कृत्य माफी योग्य नाही असे म्हटलं आहे.
एजाज अहमद यांनी काय म्हटलं आहे?
राजदचे प्रवक्ते एजाज अहमद यांनीही नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एक फेसबुक पोस्ट करत त्यांनी नितीश कुमार यांच्या मानसिक अवस्थेबाबत भाष्य केलं आहे. महिलांचा सन्मान करणं नितीश कुमार यांना मुळीच जमत नाही असंही अहमद यांनी म्हटलं आहे. या सगळ्या प्रकरणानंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया येत आहेत.
काँग्रेसची जोरदार टीका
हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. यांचा निर्लज्जपणा बघा, जेव्हा एक महिला डॉक्टर आपले नियुक्तीपत्र घेण्यासाठी आली तेव्हा नितीश कुमारांनी तिच्या चेहऱ्यावरुन हिजाब खेचला. बिहारच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने जाहीरपणे असे नीच कृत्य केलं आहे. विचार करा, राज्यातील महिला किती सुरक्षित आहेत? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. नितीश कुमारांनी या कृत्याबद्दल तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, हे माफीलायक नाही, असेही काँग्रेसने म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि एनडीएचा विजय झाला. त्यानंतर नितीश कुमार यांनी पाचव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नितीश कुमार एका महिलेचा हिजाब खेचताना दिसत आहेत ज्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
